पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑनलाईन फॅशन रिटेलींगच्या माध्यमातून जगभरात दबदबा निर्माण केलेली चीनमधील कंपनी शिन (Shein) भारतात रिलायन्सच्या माध्यमातून पुनरागमन करत आहे. २०२०मध्ये भारतात विविध चायनीज वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर बंदी घालण्यात आली होती, यात Sheinला ही भारतातील व्यवसाय बंद करावा लागला होता.
रिलायन्सची फॅशन वेबसाईट ajio.com वर Sheinचे लॉचिंग केले जाईल. सुरुवातीला पाश्चात्य कॅज्युअल प्रकारातील कपडे विकले जातील, त्यानंतर Shein रिलायन्सच्या इतर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. Sheinची भारतातील स्पर्धा ही टाटाचा ब्रँड Zudio आणि फ्लिपकार्टचा ब्रँड Myntra यांच्याशी असेल. त्यामुळे भारतातील फास्ट-फॅशन सेगमेंटमधील स्पर्धा अधिक तीव्र होताना दिसणार आहे.
रिलायन्स व्हेंचरने Shein सोबत गेल्या वर्षी भागीदारीचा करार केला होता. जगात फॅशन आणि ॲपरल प्रकारात सर्वांत जास्त ग्राहक असणारी वेबसाईट ही Shein ची आहे. जगातील एकूण सर्व वेबसाईटसचे ट्रॅफिक आहे, त्यातील २.६८ टक्के ट्रॅफिक हे Shein या वेबसाईटवर आहे, यावरून या साईटचा आवाका ओळखता येतो. विशेष बाब अशी की प्रत्यक्षात व्यवहार करणाऱ्या युजर्सची या वेबसाईटवरील संख्या ४० टक्केंनी वाढलेली आहे.
फ्रान्समधील सर्वांत मोठी फॅशन कंपनी असलेल्या Zara ला या कंपनीने मोठी टक्कर दिली असून लवकरच ती Zara ला मागे टाकणार आहे.
रिलायन्स रिटेल व्हेंचर लिमिटेड आणि रोडगेट बिझनेस लिमिटेड यांच्यात स्थानिक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी करार झालेला आहे, यावरून Shein ब्रँडने कपड्यांची विक्री केली जाईल. हा प्लॅटफॉर्म स्थानिक इन्फ्रास्ट्रक्चरवर उभारला जाईल, त्यामुळे डेटा सुरक्षेची हमी राहाणार आहे. भारतातील कापड निर्मिती करणारे आणि विक्री करणारे यांना या प्लॅटफॉर्मवर एकत्र आणले जाणार आहे.