नवी दिल्ली; वृत्तसंस्था : उद्योजक अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) अशोक पाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रकरणात अटक केली आहे. सुमारे 68.2 कोटी रुपयांची बनावट बँक गॅरंटी जारी केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा चौकशीनंतर ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट’च्या तरतुदींखाली पाल यांना ताब्यात घेण्यात आले.
हे प्रकरण रिलायन्स पॉवरची उपकंपनी असलेल्या ‘रिलायन्स एनयू बीईएसएस लिमिटेड’च्या वतीने ‘सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’(एसईसीआय)कडे सादर केलेल्या 68.2 कोटी रुपयांच्या कथित बनावट बँक गॅरंटीशी संबंधित आहे. ओडिशात कार्यरत असलेल्या ‘बिस्वाल ट्रेडलिंक’ नावाच्या कंपनीमार्फत हा बनावट बँक गॅरंटीचा घोटाळा चालवण्यात आला होता. या कंपनीवर व्यवसाय समूहांना कमिशन घेऊन बनावट बँक गॅरंटी पुरवल्याचा आरोप आहे. या कंपनीच्या संचालकाला ईडीने यापूर्वी ऑगस्ट 2025 मध्ये अटक केली आहे.
ईडीच्या सूत्रांनुसार, अशोक पाल यांनी निधी वळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. एसईसीआयच्या निविदेसाठी कागदपत्रे अंतिम करणे आणि त्यावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार पाल यांना कंपनी बोर्डाने दिले होते. पाल यांनी व्हॉटस्अॅप आणि टेलिग्रामसारख्या अॅप्सचा वापर करून व्यवहारांना मंजुरी दिली, जेणेकरून कंपनीच्या अधिकृत प्रणालीमध्ये त्याची नोंद होऊ नये, असा आरोप आहे. तसेच फिलिपाईन्समधील ‘फर्स्टरँड बँके’ची बनावट बँक गॅरंटी सादर करण्यात आली होती, मात्र त्या देशात बँकेची कोणतीही शाखा नसल्याचे तपासात उघड झाले आहे.
1) बनावट बँक गॅरंटी 68.2 कोटी रुपयांची रिलायन्स पॉवरच्या उपकंपनीने ‘एसईसीआय’कडे सादर केली होती
3) ओडिशास्थित ‘बिस्वाल ट्रेडलिंक’ कंपनीचा सहभाग
4) दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरवरून मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल