

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाकडून मतदारांसाठी नव-नव्या योजना आणल्या जात आहेत. आम आदमी पक्षाने महिलांसाठी २१०० रूपये प्रति महिना सन्मान योजनेची घोषणा केली आहे. तसेच ६० वर्षांच्या वरील ज्येष्ठांसाठी सरकारी आणि खासगी रूग्णालयांमध्ये सर्व प्रकारचे उपचार मोफत करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी या योजनेसाठी आम आदमी पक्ष उद्या सोमवारपासून नोंदणी सुरू करणार आहे. पक्षाचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (रविवार) या योजनेसाठी नोंदणी कार्यक्रमाची घोषणा केली. सोमवारपासून दिल्लीत राहणाऱ्या महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नोंदणी सुरू करण्यात येणार आहे.
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि विद्यमान मुख्यमंत्री आतिशी तसेच दिल्ली सरकारमधील अनेक मंत्री आम आदमी पक्षाचे मोठे नेते दिल्लीतील वेगवेगळ्या भागात जातील आणि स्वत:हा घरा-घरात जाउन लोकांचे रजिस्ट्रेशन करणार आहेत. घोषणा करताना केजरीवाल म्हणाले की, कोणत्याही योजनेसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभारण्याची गरज नाही. तर आम आदमी पक्ष दिल्लीच्या प्रत्येक घरा-घरात जाणार आणि महिला आणि ज्येष्ठांची नोंदणी करणार, तसेच स्मार्ट कार्ड प्रमाणे गॅरंटी कार्ड देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या योजनेला आम आदमी पक्षाच्या घर-घरात पोहोचण्याचे एक माध्यम स्वरूपात पाहण्यात येत आहे. कारण या नोंदणीच्या माध्यमातून आम आदमी पक्षाचे नेते-कार्यकर्ते दिल्लीतील प्रत्येक घरातील महिला आणि ज्येष्ठांचे रजिस्ट्रेशन करणार आहेत. या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पाेहाेचण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दावा केला आहे की, दिल्ली सन्मान योजनेतून ३५ ते ४० लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच संजीवनी योजनेच्या माध्यमातून जवळपास १०-१५ लाख महिलांना याचा फायदा मिळणार आहे. दरम्यान या योजनेच्या माध्यमातून दिल्लीच्या प्रत्येक घरात पोहोचण्याचे आम आदमी पक्षाचे ध्येय असून, याचा पक्षाला काय फायदा होतो हे येत्या विधानसभेच्या निकालातच स्पष्ट होणार आहे. मात्र सध्यातरी केजरीवाल हे निवडणुकीच्या प्रचारासाठी आक्रामक पद्धतीने पावले टाकत असल्याचे दिसून येत आहे. तसेच विरोधकांवर कडाडून टीकास्त्र सोडत आहेत.