

नवी दिल्लीः महाराष्ट्र भाजपची धुरा माजी मंत्री रवींद्र चव्हाण सांभाळणार आहेत. त्यांची महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. यासंबंधीची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी केली. चव्हाण यांची नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू होईल, असे नियुक्तीपत्रात म्हटले आहे. मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी चव्हाण यांचे नाव चर्चेत होते.
भारतीय जनता पक्षाच्या शिर्डीतील अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही मोठी नियुक्ती केली आहे. सध्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यात महसूल मंत्री झाले आहेत. त्यांच्यानंतर रविंद्र चव्हाण हेच पुढील प्रदेशाध्यक्ष असतील, अशा चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून होत्या. शिर्डीतील अधिवेशनात चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल, असेही बोलले जात होते. मात्र तूर्तास त्यांच्याकडे भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मार्चमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षपदाची निवड होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, २८ डिसेंबर रोजी, रवींद्र चव्हाण यांची संघटनेच्या नियोजनावर देखरेख ठेवण्यासाठी भाजपच्या प्रदेश समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
रविंद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते २००९ पासून सलग ४ वेळा त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निडवणुकीत त्यांनी ५० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवले होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.