

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोने तस्करीप्रकरणी अटक करण्यात आलेली कन्नड आणि तामिळ चित्रपट अभिनेत्री रान्या रावचे सावत्र वडील, कर्नाटकातील डीजीपी दर्जाचे अधिकारी रामचंद्र राव यांना शनिवारी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. रामचंद्र राव हे सध्या कर्नाटक राज्य पोलिस गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत आहेत.
अभिनेत्री रान्या रावला ३ मार्च रोजी दुबईहून परतताना बेंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली होती. तिच्याकडून १२.५६ कोटी रुपयांची १४.२ किलो सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली होती. रामचंद्र राव यांनी मुलीच्या अटकेनंतर या प्रकरणात कोणाताही संबंध नसल्याचे म्हटले होते. मुलीच्या अटकेबद्दल मीडिया रिपोर्ट्सवरूनच माहिती मिळाली, कारण दुसऱ्या लग्नानंतर मुलगी वेगळी राहत होती. त्यामुळे कथित तस्करी बाबत कोणतीही माहिती नव्हती, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, केम्पेगौडा विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये प्रोटोकॉल अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबलने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, रामचंद्र राव यांच्या आदेशांचे पालन करत आहे.
कर्नाटक सरकारने १० मार्च रोजी रामचंद्र राव यांची सोन्याची तस्करी प्रकरणी चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव गौरव गुप्ता यांची नियुक्ती केली. रामचंद्र राव यांची कारकिर्द अनेक वादांनी भरलेली आहे. २०१४ मध्ये, त्यांना हवाला घोटाळ्यात अडकवण्यात आले होते. त्यांच्यावर २.०७ कोटी रुपये जप्त करण्याचा आणि गैरव्यवहार केल्याचा आरोप होता. ज्यामुळे त्यांना म्हैसूर रेंजच्या पोलिस महानिरीक्षकपदावरून काढून टाकण्यात आले. नंतर बनावट चकमकीत सहभागी असल्याबद्दल सीआयडीने त्यांची चौकशी केली. आता या प्रकरणाची डीआरआय व्यतिरिक्त, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) तसेच सीबीआय देखील एकाचवेळी चौकशी करत आहेत.