

नवी दिल्ली: वादग्रस्त टिप्पणीमुळे अडचणीत आलेला यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. अलाहाबादिया आणि इतरांच्या वक्तव्यामुळे इंडियाज गॉट लॅटेंट हा शो चर्चेत आला आहे. या प्रकरणी अलाहाबादियातर्फे सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे सुपुत्र अभिनव चंद्रचूड हा खटला लढवत आहेत. या प्रकरणाच्या तातडीने सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आहे. जेव्हा सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाच उल्लेख झाला तेव्हा अलाहाबादियाचे प्रतिनिधित्व करणारे वकील न्यायालयात हजर झाले. ते अभिनव चंद्रचूड होते, जे मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आणि माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. अभिनव चंद्रचूड यांनी मागच्या ८ वर्षामध्ये सर्वोच्च न्यायालयात एकही खटला लढवलेला नाही.
अभिनव चंद्रचूड यांनी स्टॅनफोर्ड लॉ स्कूलमधून डॉक्टर ऑफ द सायन्स ऑफ लॉ आणि मास्टर ऑफ द सायन्स ऑफ लॉ पदवी घेतली आहे. तिथे ते फ्रँकलिन फॅमिली स्कॉलर होते. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांनी २००८ मध्ये मुंबईतील सरकारी कायदा महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. नंतर त्यांनी डाना स्कॉलर म्हणून हार्वर्ड लॉ स्कूलमधून कायद्यात पदव्युत्तर पदवी (एलएलएम) मिळवली. त्यांनी गिब्सन, डन आणि क्रचर या आंतरराष्ट्रीय कायदा फर्ममध्ये सहयोगी वकील म्हणूनही काम केले आहे. अभिनव चंद्रचूड यांनी वकीलीव्यतिरीक्त अनेक पुस्तके लिहिली आहेत. ज्यात रिपब्लिक ऑफ रेटोरिक: फ्री स्पीच अँड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया (२०१७) आणि सुप्रीम व्हिस्पर्स: कॉन्व्हर्सेशन्स विथ जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया १९८०-१९८९ (२०१८) यांचा समावेश आहे. दरम्यान, १० नोव्हेंबर २०२४ रोजी अभिनव यांचे वडील धनंजय चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पदावरुन निवृत्त झाले आहेत.