

पुढारी ऑनलाईन :
Rangbhari Ekadashi 2025 : हिंदू धर्मात एकादशीच्या तिथीला विशेष महत्व आहे. ही एकादशी विष्णूला समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूची कृपा प्राप्त होण्यासाठी अनेकजण व्रत ठेवतात आणि पूजा अर्चना करतात. या एकादशींमधील एक रंगभरी एकादशी आहे. जी प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्यात शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला साजरी केली जाते. मात्र रंगभरी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू सोबतच शंकर आणि पार्वती या देवतांचीही पूजा केली जाते. आजच्या दिवशी काशी विश्वनाथ मंदिरात देवांचे देव शंकर आणि पार्वती यांची विशेष पूजा केली जाते. सोबतच गुलाल, अबीर आणि फुलांची होळी खेळली जाते. यासोबतच काशी विश्वनाथांचा विशेष श्रृंगार देखील केला जातो. जाणून घेऊयात या दिवसाशी जोडल्या गेलेल्या धार्मिक मान्यता.....
रंगभरी एकादशी काशी विश्वनाथ मंदिरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बाबा विश्वनाथ, माता पार्वती, गणेश आणि कार्तिक यांचा विशेष शृंगार केला जातो. या शिवाय देवांना हळद, तेलाची धार्मिक विधी पार पाडला जातो. देवाला अबीर-गुलाल वाहिला जातो. आज सकाळपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे. दिवसभर विशेष पूजा अर्चनेनंतर सायंकाळी बाबा विश्वनाथ यांच्या चांदीच्या मुर्तीला पालखीत बसवून नगर प्रदक्षिणा करण्यात येते. शोभा यात्रेत भाविकांकडून मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करण्यात येते.
पौराणिक मान्यतेनुसार, फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या तिथीला भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा लग्न लावून पहिल्यांदा काशीला आले होते. काशीमध्ये आल्यानंतर देवीदेवतांनी त्यांचे भव्य स्वागत केले होते. देवादिकांनी त्यांच्यावर फूल आणि अबीराची उधळण केली होती. त्यावेळेपासून हा दिवस शिव-पार्वती यांच्यातील महत्वाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. मान्यतेनुसार, भगवान शिव त्यांची अर्धांगिनी माता पार्वतीला नगर भ्रमण करवतात. या आनंदातच भाविक आज अबीर-गुलाल उधळतात. या शिवाय देवाला हळद, तेल वाहण्याचीही पद्धत आहे. देवाच्या पायी अबीर आणि गुलाल वाहिला जातो. हा सण काशीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावेळी भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी होतात.
रंगभरी एकादशीशी संबंधित लोकांमध्ये अशी श्रद्धा आहे की, जर भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा केली तर वैवाहिक जीवन सुखी राहते. विवाहित महिला या दिवशी अखंड सौभाग्यासाठी व्रत ठेवतात. तसेच सुवासिनींना श्रृंगार करावयाच्या वस्तू भेट देतात. या दिवशी अबीर-गुलाल उडविल्याने जीवन सुखी आणि समाधानी होते.
रंगभरी एकादशी दिवशी काशी पूर्णपणे शिवमय होते. भाविक या दिवशी महादेवाच्या भक्तीत तल्लीन होतात. आज होणाऱ्या शोभायात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. भगवान विश्वनाथाच्या दरबारात डोके टेकवून आशिर्वाद घेतात. शिवशक्तीची पूजा केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे.