

Rats Ate 200 kg marijuana: रांची कोर्टानं नुकतेच गांजा प्रकरणात मुख्य आरोपींची निर्दोष मुक्तता केली. मात्र या निर्णयानंतर व्यवस्था आणि प्रक्रियेतील गंभीर तृटींची चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेला जवळपास १ कोटी रूपये किंमतीचा २०० किलो गांजा हा उंदरांनी फस्त केला होता. हे प्रकरण कोर्टात पोहचलं होतं.
हे प्रकरण जानेवारी २०२२ मधले आहे. ओरमांझी पोलीसांनी एका टीपनंतर राष्ट्रीय महामार्ग २० वर एक बलेरो गाडी आडवली होती. पोलिसांना या गाडीतून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाची तस्करी करत असल्याचा संशय होता. ही गाडी रांचीपासून रामगड इथं चालली होती.
पोलिसांनी गाडी अडवली मात्र त्या गाडीतील तिघेजण फरार झाले. पोलिसांनी इंद्रजीत उर्फ अनुरजीत रायला अटक केली. हा बिहारच्या वैशाली जिल्ह्याचा रहिवासी होती. दोघे मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले.
पोलिसांना तपासादरम्यान २०० किलो गांजा सापडला. त्यानंतर रायला अटक करून त्याच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं. त्याच्यावर नार्कोटिक्स ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्ट (NDPS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र ज्यावेळी प्रकरण कोर्टात पोहचलं त्यावेळी सुनावणीदरम्यान अनेक बाबींबाबत कोणतीच स्पष्टता नव्हती. साक्षीदाराची साक्ष एकसारखी नव्हती. मुलभूत गोष्टींची माहिती नमूद करण्यात आलेली नव्हती. कोणती आरोपीला ताब्यात घेतलं. कोणत्या ठिकाणावर ही गाडी अडवण्यात आली याची संपूर्ण माहिती नव्हती.
दरम्यान, पोलिसांनी कोर्टात एक धक्कादायक माहिती सांगितलं. ज्या गांजासाठी रायला अटक झाली होती. तो पुरावाच पोलीस सांभाळून ठेऊ शकले नाहीत. जप्त केलेला गांजा हा ओरमांझी पोलीस ठाण्याच्या मालखाना (स्टोअरेज) इथं ठेवण्यात आला होता. आता तो तिथं नाहीये. २०२४ च्या स्टेशन डायरीमध्ये हा २०० किलो गांजा ज्याची किंमत जवळपास १ कोटी रूपये होती तो उंदरांनी खाऊन फस्त केल्याची नोंद आहे.
कोर्टानं या प्रकरणात निकाल देताना पोलिसांनी या प्रकरणात ठेवलेल्यात्रुटींवर बोट ठेवलं. पोलिसांना राय आणि जप्त केलेली गाडी, गांजा, स्टोएरेज आणि साधी प्रक्रिया यांच्यात कोणताच परस्पर संबंध लावता आलेला नाही असा शेरा दिला. यानंतर कोर्टानं, 'कोणताही ठोस पुरावा उरलेला नाही आणि चेन ऑफ कस्टडी पूर्णपणे तुटलेली आहे. त्यामुळे संशयाचा फायदा हा आरोपीला मिळत आहे.' असं सांगत राय याची या प्रकरणातून मुक्तता केली.
हे प्रकरण कायद्याचे रक्षक म्हणवल्या जाणारे पोलीस उच्च दर्जाच्या जप्त केलेल्या वस्तूंचे संरक्षण करण्यात असमर्थ आहेत हे अधोरेखत करते. झारखंडमध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेले अंमली पदार्थ गायब होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी धनबाद येथील अधिकाऱ्याने देखील या वर्षाच्या सुरूवातीला सरकारी गोदामातील महागडी दारू उंदरांनी पिल्याचा दावा केला होता.