

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुस्लिम तरुणांची दिशाभूल करून त्यांना दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (आयएस)मध्ये सामील करून घेण्याचे मोठे षडयंत्र रचले जात होते. यासाठी हे दहशतवादी डार्क वेब, क्रिप्टो करन्सी आणि टेलिग्रामची मदत घेत होते, असा महत्त्वपूर्ण खुलासा रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.
बेंगळुरू रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींविरुद्ध 'एनआयए'ने आज (दि. ९ सप्टेंबर) मुसावीर हुसेन शाजिब, अब्दुल मतीन अहमद ताहा, माझ मुनीर अहमद आणि मुजम्मिल शरीफ या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी), दहशतवादविरोधी कायदा (UAPA), स्फोटक पदार्थ कायदा आणि PDLP कायद्याच्या संबंधित कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
१ मार्च २०२४ रोजी बंगळूरुच्या आयटीपीएलच्या ब्रूकफिल्डमधील रामेश्वरम कॅफेमध्ये आयईडी स्फोटात नऊ जण जखमी झाले होते. हॉटेल मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. होते. एनआयएने ३ मार्च रोजी या प्रकरणाचा तपास हाती घेतला. एनआयएने विविध राज्य पोलीस दल आणि इतर एजन्सींच्या समन्वयाने या प्रकरणातील अनेक तांत्रिक बाबींचा तपास केला होता. कॅफेमध्ये शाजिब यानेच बॉम्ब ठेवल्याचे तपासात समोर आले आहे. एनआयएने त्याला पश्चिम बंगालमध्ये अटक केली होती. कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील रहिवासी असलेले दोघेही इसिसशी संबंधित होते. त्यांनी यापूर्वी सीरियातील इसिसच्या भागात स्थलांतर करण्याचा कट रचला होता, असेही तपासात स्पष्ट झाले होते.
माझ मुनीर अहमद आणि मुझम्मिल शरीफ या दोन निष्पाप तरुणांना आयएस विचारसरणीकडे कट्टर बनवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. या दोघांबरोबर अन्य काही तरुणांनाही देशविरोधी कारवाईत सहभागी करुन घेण्याचा डावा होता. ताहा आणि शाजिबने फसवणूक करून मिळवलेली भारतीय सिमकार्ड आणि भारतीय बँक खाती वापरली. सुरक्षा यंत्रणांनी पकडले जाऊ नये म्हणून त्याने डार्क वेबची मदत घेतली. (डार्क वेबच्या माध्यमातून आपली ओळख अंधारात ठेवून बेकायदेशीर कृत्य केली जातात.) डार्क वेबच्या मदतीने त्याने विविध भारतीय आणि बांगलादेशी ओळखपत्रांची कागदपत्रे डाउनलोड केली होती. लश्कर-ए-तोयबा बंगळूरु कट प्रकरणातील फरारी मोहम्मद शहीद फैसल याच्याशी ताहाची ओळख माजी दोषी शोएब अहमद मिर्झा याच्याशी झाली होती, असेही तपासात उघड झाले आहे. तहाने त्याचा हँडलर फैसलची अल-हिंद ISIS मॉड्यूल प्रकरणातील आरोपी मेहबूब पाशा आणि ISIS दक्षिण भारताचा अमीर खाजा मोहिद्दीन आणि नंतर माझ मुनीर अहमद यांच्याशी ओळख करून दिली. या सर्वांनी मिळून इसिसच्या विचारसरणीनुसार दहशतवाद पुढे नेण्याचा कट रचला होता., असेही एनआयएने आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे.
ताहा आणि शाजिब यांना दहशतवादी हल्ले करण्यासाठी त्यांच्या हँडलरने क्रिप्टो करन्सीद्वारे आर्थिक मदत केली होती. ताहा याने टेलिग्राम आधारित P2P प्लॅटफॉर्मच्या मदतीने रकमेचा वापर बेंगळुरूमध्ये हिंसाचाराच्या विविध घटना घडवण्यासाठी केल्याची माहितीही तपासात समाेर आली आहे. २२ जानेवारी २०२४ अयोध्येतील अभिषेक समारंभाच्या दिवशी राज्य भाजप कार्यालय, मल्लेश्वरम, बेंगळुरूवर बाॅम्बस्फाेटाचा कट रचला हाेता. मात्र ताे उधळला गेला. यानंतर दोन मुख्य आरोपींनी रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचेही तपासात स्पष्ट झाल्याचे एनआयएने आपल्या आराेपपत्रात म्हटलं आहे.