Ramdas Phutane : जशी प्रजा, तसे आमदार-खासदार मिळणार, रामदास फुटाणे यांची ‘सामना’च्या निमित्ताने मार्मिक टिप्पणी

‘देशात चळवळी उभ्या राहतात आणि त्यासमोर सरकारला झुकावे लागते’
Ramdas Phutane : जशी प्रजा, तसे आमदार-खासदार मिळणार, रामदास फुटाणे यांची ‘सामना’च्या निमित्ताने मार्मिक टिप्पणी
Published on
Updated on

प्रशांत वाघाये

नवी दिल्‍ली : देशातील राजकीय परिस्थिती अनेक वर्षांत बदललेली नाही. ‘सामना’ चित्रपटात तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचे केलेल्‍या चित्रणाचे प्रतिबिंब आजही दिसते. पक्ष कोणता, हा मुद्दा नसून समाजाची जडणघडण आणि लोकांची मानसिकता यावरच राजकीय नेतृत्वाचे स्वरूप ठरते. जशी प्रजा, तसेच आमदार-खासदार मिळणार, असे परखड मत सामना चित्रपटाचे निर्माते आणि कवी रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.

राजधानी दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या पुढाकाराने आयोजित पहिल्या दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी ऐतिहासिक ‘सामना’ या ऐतिहासिक चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग करण्यात आले. यानंतर फुटाणे यांनी उपस्थितांशी आभासी संवाद साधला. ते म्हणाले, देशातील राजकीय परिस्थिती ‘सामना’मध्ये दाखविलेल्या परिस्थितीप्रमाणेच आजही आहे. देशात चळवळी उभ्या राहतात आणि त्यासमोर सरकारला झुकावे लागते, हे अनेकदा दिसले. अलीकडेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सरकारला झुकवले. एखाद्या प्रश्नावर समाजातून उभ्‍या राहणार्‍या चळवळीत मोठी ताकद असते. मात्र चळवळीचे रूपांतर राजकीय पक्षात झाले की, उमेदवारी मागणारे, पदे आणि राजकीय संधी शोधणारे घटक त्यात प्रवेश करतात. त्यानंतर मूळ चळवळच अस्ताला जाते की काय, अशी भीती वाटते.

९९ टक्के लोक भावुक अन्‌ भाविक

देशातील ९९ टक्के लोक भावुक आणि भाविक आहेत. त्यामुळे लोकांच्या आवडी-निवडीच्या विरुद्ध जाणे कठीण झाले आहे. राजकारण आणि समाजजीवन समजून घेताना या सामाजिक वास्तवाचाही विचार करावा लागतो, असे फुटाणे यांनी समाजाच्या मानसिकतेबद्दल बोलताना सांगितले.

गडकरींनी सातवेळा पाहिला ‘सामना’

‘सामना’ चित्रपटाच्या आठवणी सांगताना फुटाणे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही उल्लेख केला. माझे मित्र नितीन गडकरी यांनी हा चित्रपट सात वेळा पाहिला. चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले, चित्रपट परदेशात गेला. मात्र सुरुवातीला तो फारसा चालला नव्हता, हे देखील त्यांनी आवर्जून सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news