

नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप एनडीएने जोरदार मुसंडी मारत १९ जागांवर बिनविरोध विजय मिळवला. दुसरीकडे, विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीचे ५ उमेदवारही बिनविरोध निवडून आले.
मध्य प्रदेशमधून भाजपचे तरुण चुग, रजनीश अग्रवाल आणि महेश केवट हे बिनविरोध विजयी झाले. आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेतील संख्याबळाच्या जोरावर एनडीएने वायएसआर काँग्रेसकडून ३ जागा हिसकावून घेत सर्व ४ जागांवर विजय मिळवला. यामध्ये टीडीपी ३ आणि जनसेना १ जागेवर विजयी झाले.
गुजरातच्या सर्व ४ जागांवर भाजपने विजय मिळवला असून, काँग्रेसचे शक्तीसिंह गोहील यांची एकमेव जागाही आता भाजपाकडे गेली. राजस्थानमध्ये परिस्थिती 'जैसे थे' राहिली. भाजपाने २ जागा जिंकल्या, तर काँग्रेसचे नीरज डांगी आपली जागा राखण्यात यशस्वी ठरले.
कर्नाटकमध्ये काँग्रेसला मोठा फायदा झाला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसने ३ जागा जिंकल्या. यामध्ये काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांचा समावेश आहे. तर एनडीएला केवळ १ जागेवर समाधान मानावे लागले.
मेघालयात एनपीपीचे जेम्स कॉनराड, अरुणाचल प्रदेशात भाजपचे ताई तागाक आणि मणिपूरमध्ये ए. शारदा देवी बिनविरोध निवडून आल्या. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन, ओडिशातून भाजपचे देवाशिष सामंतराय आणि तामिळनाडूतून काँग्रेसचे प्रवीण चक्रवर्ती बिनविरोध विजयी झाले. दरम्यान, झारखंडमधील दोन आणि मिझोरममधील एका जागेसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे.