

Sahitya Akademi awards 2025
नवी दिल्ली : साहित्य अकादमीने आज (दि. १६ मार्च) २४ भारतीय भाषांमधील आपले वार्षिक पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये आत्मचरित्र श्रेणीत राजू बाविस्कर यांच्या 'कळ्यानिळ्या रेषा') पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. यंदा प्रतिष्ठित सन्मानासाठी आठ काव्यसंग्रह, चार कादंबऱ्या, सहा कथासंग्रह, दोन निबंधात्मक कार्ये, एक साहित्यिक समीक्षा, एक आत्मचरित्र आणि दोन आठवणींच्या (Memoirs) पुस्तकांची निवड करण्यात आली आहे.
साहित्य अकादमीने आत्मचरित्र श्रेणीत राजू बास्किर यांच्या 'कळ्यानिळ्या रेषा' (मराठी) आत्मचरित्राची निवड केली आहे. सन्मानचिन्ह (कोरीव ताम्रपट), शाल आणि १ लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ३१ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित एका समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील.
काव्यसंग्रह
या श्रेणीमध्ये 'श्रेष्ठ कविता' (बंगाली), 'ठाकूर सत्सयी' (डोगरी), 'भट्टखडकी' (गुजराती), 'नजदवानैक्य पोत आलव' (काश्मिरी), 'पदापुराण' (ओडिया), 'प्रस्थानचतुष्टये ब्रह्मघोष:' (संस्कृत), नंदिनी सिधा रेड्डी यांचा 'अनिमेषा' (तेलगू) आणि 'सफर जारी है' (उर्दू) यांचा समावेश आहे.
कादंबरी
पुरस्कारासाठी निवडलेल्या कादंबऱ्यांमध्ये 'कर्ही खेलर साधू' (आसामी), 'द्वंग्नवी लामा म्वन्से गाथ्वन' (बोडो), 'क्रिम्सन स्प्रिंग' (इंग्रजी) आणि 'मायामानुष्यार' (मल्याळम) यांचा समावेश आहे.
कथासंग्रह
कथासंग्रह श्रेणीमध्ये 'दादा सीरिसू तंदे' (कन्नड), 'कांगलामद्रिबा इफूत' (मणिपुरी), 'सेफ्टी किट' (पंजाबी), 'भरखमा' (राजस्थानी), 'मिड बिरना चेन्ने साओन इनाग सगाई' (संताली) आणि 'वाघू' (सिंधी) यांनी विजय मिळवला आहे.
इतर श्रेणी
निबंध: 'कोंकणी काव्यम: रुपाणी आणि रुपाकाम' (कोंकणी) आणि 'नेपाळी पारंपारिक संस्कृती रा सभ्यता को डुकुटी' (नेपाळी).
साहित्यिक समीक्षा: 'तमिळ सिरुकथाईन थाडंगल' (तमिळ).
आठवणी (Memoirs): 'जीते जी अलाहाबाद' (हिंदी) आणि 'धात्री पात सन गाम' (मैथिली).
राजू बाविस्कर यांचे 'कळ्यानिळ्या रेषा' आत्मचरित्र हे केवळ एका चित्रकाराचे जगणं शब्दबद्ध करत नाही तर समाजातील एका वंचित वर्गाच्या प्रवासाचे कथन आहे. चित्रकार राजू बाविस्कर यांनी आपल्या चित्रातून वंचितांचे जगणं मांडलं. यानंतर त्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या वंचित जगण्याला शब्दांमधून वाट करून दिली. व्यक्तिचित्रणाच्या अंगाने जाणारे हे आत्मकथन वाचकांना अंतर्मुख करणारा अनुभव देतो.