

गुवाहाटी; वृत्तसंस्था : ईशान्य सीमांत रेल्वेच्या लुमडिंग विभागांतर्गत जमुनामुख-कॅम्पूर स्थानकांदरम्यान शनिवारी पहाटे सायरांग - नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस 42 हत्तींच्या कळपाला धडकल्याने इंजिनसह 5 डबे रुळावरून घसरले. या घटनेत 7 हत्तींचा जागीच मृत्यू झाला असून सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे हा अपघात झाला. 42 हत्तींचा कळप रेल्वे रूळ ओलांडत असताना वेगात असलेल्या राजधानी एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली. लोको पायलटने हत्तींना पाहताच आपत्कालीन ब्रेक लावले. मात्र वेग जास्त असल्यानेधडक टाळता आली नाही. ही धडक इतकी भीषण होती की, रेल्वेचे पाच डबे रुळावरून खाली उतरले. गुवाहाटीपासून सुमारे 126 किमी अंतरावर ही घटना घडली आहे.
मृतांमध्ये गर्भवती हत्तीणीचा समावेश
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पावलेल्या 7 हत्तींमध्ये एका गर्भवती हत्तीणीचा समावेश आहे. तसेच काही दिवसांचे एक लहान पिल्लू गंभीर जखमी झाले असून त्याला काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळील वन्यजीव पुनर्वसन केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
रेल्वे प्रशासनाची तत्परता, मदतकार्य
घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि मदत पथक घटनास्थळी दाखल झाले. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना इतर डब्यांमध्ये सामावून घेण्यात आले आणि सकाळी 6.11 वाजता रेल्वे गुवाहाटीकडे रवाना करण्यात आली. गुवाहाटी स्थानकावर प्रवाशांसाठी हेल्पलाईन क्रमांक (0361-2731621/22/23) जाहीर करण्यात आले आहेत.