

जयपूर : मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखालील राजस्थान सरकारने हरित ऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत राज्याची एकूण स्थापित क्षमता ५१.६ गिगावॅटवर नेली आहे. यामध्ये एकट्या सौरऊर्जेचा वाटा तब्बल ४५.१ गिगावॅट इतका असून देशातील एकूण अक्षय ऊर्जा निर्मितीत राजस्थानचा वाटा १५ टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती राजस्थान सरकारच्या वतीने कळवण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार डिसेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२६ या ३४ महिन्यांच्या कालावधीत राज्यात तब्बल २८ ते २९ गिगावॅट नवीन अक्षय ऊर्जा क्षमतेची भर पडली आहे. या वेगवान प्रगतीमुळे राजस्थान सौरऊर्जा प्रस्थापना आणि निर्मितीत देशात पहिल्या, तर एकूण अक्षय ऊर्जा क्षमतेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. अतिरिक्त वीज निर्मितीमुळे राज्याने इतर राज्यांना सुमारे २,००० कोटी रुपयांची वीज विकून मोठा महसूल मिळवला आहे.
‘पीएम-कुसुम’ योजनेअंतर्गत ५,५०० मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेचे विकेंद्रित सौर प्रकल्प उभारले गेले असून त्यातून ३.८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळत आहे. तसेच ‘पीएम सूर्य घर’ योजनेतून ३.५५ लाखांहून अधिक घरांवर रुफटॉप सोलर बसवण्यात आले आहेत. वीज वितरण कंपन्यांची (डिस्कॉम) कार्यक्षमता सुधारल्याने पारेषण व वितरण हानी १९.४३ टक्क्यांवरून १२.८४ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.
आगामी २०३० पर्यंत राज्याची स्वच्छ ऊर्जा क्षमता १२५ गिगावॅटपर्यंत (९० गिगावॅट सौर, २५ गिगावॅट पवन/हायब्रीड आणि १० गिगावॅट स्टोरेज) नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.