

रायपूर : आमिष दाखवून वा फसवून अन्य धर्मात गेलेल्या 240 कुटुंबांना 5 नोव्हेंबर रोजी विधिवत पुन्हा वैदिक सनातन हिंदू धर्मात घेण्यात आले. श्रीमद नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली येथे विधिवत हा सोहळा झाला. श्रीमद नरेंद्राचार्यामुळे आजपर्यंत 1,52,594 लोकांनी हिंदू धर्म पुनर्प्रवेश केला आहे.
हिंदू धर्मबांधवाना सुनियोजित षडयंत्राद्वारे विविध आमिषे दाखवून, भुलथापा देऊन, त्यांच्या अज्ञानाचा, गरिबीचा गैरफायदा घेऊन, त्यांचे धर्मांतरण करण्यास भाग पाडले जात आहे. अशा धर्मांतरीत हिंदूंना पुन्हा हिंदुधर्मात आणण्यासाठी रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणिजधाम या पिठाची धार्मिक विंग यासाठी कार्य करत असते. ज्यावेळी परधर्मात गेलेल्या व्यक्तींना कुटुंबांना आपण पर धर्मात गेल्याची जाणीव होते त्यावेळी पुनश्च स्वधर्मात येण्याची इच्छा असते. अशा कुटुंबांना पुन्हा घरवापसी सोहळ्याने विधिवत धर्मप्रवेश देण्याचे महाअभियान श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जात आहे.
गुडियारी रायपूर छत्तीसगड येथे आयोजित सोहळ्यात 240 कुटुंबांनी स्वधर्मात प्रवेश केला आहे. यावेळी प्रायश्चित्त विधान, शुद्धीकरण, भगवान विष्णुपूजन गोमाता पूजन, होम हवन इत्यादी विधी झाले. या सर्व बांधवांना जगद्गुरूंनी ‘यापुढे मी हिंदू धर्माची उपासना, रितीरिवाज प्रथा परंपरांचे तंतोतंत पालन करेन, मी अन्य धर्मात जाणार नाही, मी जन्माने हिंदू आहे आणि हिंदू म्हणून जगेन’ अशी शपथ दिली. त्यानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्यांनी रामनामाची दीक्षा देऊन गळ्यात कंठी घातली व हिंदू धर्म संस्कृती, संस्कारावर मार्गदर्शन केले.ज्या लोकांना हिंदू धर्मातील उपासना पद्धती बदलल्यामुळे अपराधी वाटत होते, ते आम्हाला येऊन भेटले. म्हणून आम्ही आता त्यांना पूर्वीची उपासना पद्धती सुरू करून दिली आहे.
या सोहळ्यास जसपूर परगाण्याचे छत्रपती प्रबळ प्रताप सिंह जुदेव उपस्थित होते. जगद्गुरूं रामानंदाचार्यांनी ज्या कुटुंबांना हिंदू धर्मात पुनर्प्रवेश दिला त्या कुटुंबाचे छत्रपती महाराज प्रबळ प्रताप सिंह जुदेव यांनी त्यांचे पाय धुवून हिंदू धर्मात स्वागत केले. यावेळी निळकंठ महाराज, संत श्री युधिष्ठिर लालजी, स्वामी राजेश्वर आनंद, महंत देवादास, दीपक लखोटिया आदी उपस्थित होते.