

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले हरियाणातील मतचोरीचे आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी फेटाळून लावले. राहुल गांधींचे आरोप निराधार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले. हरियाणातील मतदार यादीविरोधात कोणतेही अपील दाखल करण्यात आले नव्हते. तसेच मतदानावेळी कोणतेही बनावट मतदान झाल्याचे आढळले नव्हते, असे आयोगाने म्हटले.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत २५ लाख मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केल्यानंतर निवडणूक आयोगाने प्रत्युत्तर दिले. ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या हरियाणाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या बूथ प्रतिनिधींनी मतचोरी झाल्याचे का दाखवले नाही असा प्रश्न निवडणूक आयोगाने उपस्थित केला. मतदार यादीत चुका असतील तर त्या शोधण्यासाठी राजकीय पक्षांकडून बूथ-स्तरीय प्रतिनिधी बीएलए नियुक्त केले जातात, असे निवडणूक आयोगाने म्हटले. हरियाणातील मतदार यादीविरोधात एक देखील अपील दाखल करण्यात आले नव्हते. पंजाब उच्च न्यायालयात सध्या फक्त २२ निवडणूक याचिका प्रलंबित आहेत.२३ निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आणि नंतर एक मागे घेण्यात आली, असे निवडणूक आयोगाने म्हटले.
मतदान केंद्रांवर काँग्रेसचे बूथ प्रतिनिधी काय करत होते? जर मतदाराने आधीच मतदान केले असेल किंवा बूथ प्रतिनिधींना मतदाराच्या ओळखीबद्दल शंका असेल तर त्यांना आक्षेप का घेतला नाही? असा सवाल निवडणूक आयोगाने उपस्थित केला. ग्रामपंचायत आणि नगरपालिकांनी ज्या घरांचे क्रमांक दिलेले नाहीत त्या घरांना शून्य क्रमांक देण्यात आले असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले.