

नवी दिल्ली : शिक्षण व्यवस्थेत कोणालाही जातीच्या आधारावर भेदभावाचा सामना करावा लागू नये, यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधींनी रोहित वेमुलाच्या नावाने कायदा तयार करण्याचा मागणी केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांना तसे पत्र राहुल गांधींनी लिहीले आहे. या पत्रात राहुल गांधींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील काही गोष्टींचा संदर्भ दिला.
आपल्या पत्रात राहुल गांधींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेल्या एका घटनेचा उल्लेख केला. ते म्हणाले की, "आमच्यासोबत भरपूर अन्न होते. आम्हाला भूक लागली होती. मात्र तरीही आम्हाला अन्नाशिवाय झोपावे लागत होते, आम्हाला पाणीही मिळत नव्हते कारण आम्ही अस्पृश्य होतो. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहेत.” सोबतच बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील आणखी एक प्रसंगही राहुल गांधींनी सांगितला.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना राहुल गांधी म्हणाले की, तुम्हीही सहमत असाल की डॉ. आंबेडकरांना ज्या गोष्टींना तोंड द्यावे लागले ते लज्जास्पद होते, भारतातील कोणत्याही मुलाने अशा गोष्टी सहन कराव्या लागु नयेत. मात्र आजही आपल्या शैक्षणिक व्यवस्थेत दलित, आदिवासी आणि ओबीसी समुदायातील लाखो विद्यार्थ्यांना अशा क्रूर भेदभावाचा सामना करावा लागतो, हे लाजिरवाणे आहे. रोहित वेमुला, पायल तडवी आणि दर्शन सोलंकी सारख्या प्रतिभावान तरुणांची हत्या स्वीकारार्ह नाही. हे पूर्णपणे थांबवले पाहिजे. म्हणून मी कर्नाटक सरकारला रोहित वेमुला कायदा लागू करण्याची मागणी करतो. रोहित वेमुला आणि इतर लाखो लोकांनी जे भोगले ते भारतातील कोणत्याही मुलाला भोगावे लागू नये, असेही ते म्हणाले.
सोशल मीडियावर व्यक्त होत राहुल गांधी म्हणाले की, २०१६ मध्ये रोहित वेमुलाने जातीच्या भेदभावामुळे आत्महत्या केली होती. अलीकडेच मी संसदेत दलित, आदिवासी आणि ओबीसी समुदायातील विद्यार्थी आणि शिक्षकांना भेटलो. यात त्यांनी सांगितले की महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये त्यांना जातीवर आधारित भेदभावाचा कसा सामना करावा लागतो. आंबेडकरांनी हे दाखवून दिले होते की शिक्षण हे एकमेव साधन आहे ज्याद्वारे वंचितांनाही सक्षम बनवता येते आणि जातिव्यवस्था मोडता येते. मात्र हे दुर्दैवी आहे की एवढ्या दशकांनंतरही आपल्या शिक्षण व्यवस्थेत लाखो विद्यार्थ्यांना जातीभेदाचा सामना करावा लागत आहे, असेही ते म्हणाले.