

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी १३ जानेवारीपासून प्रचारात उतरणार आहेत. राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या काही सभांमध्ये सहभागी होत जोरदार प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर राहुल गांधी काँग्रेसच्या प्रचारासाठी येत आहेत.
आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण पक्षासह फार पूर्वीपासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेसकडून मात्र राष्ट्रीय नेतृत्वाने आतापर्यंत त्याअर्थी प्रचाराला सुरुवात केली नव्हती. या पार्श्वभूमीवर येत्या १३ तारखेपासून काँग्रेसचे राष्ट्रीय नेते या प्रचाराचा सहभागी होत आहेत. काँग्रेस दिल्ली विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकद लावली आहे. राहुल गांधींसह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत, सचिन पायलट, सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार, रेवंथ रेड्डी, सुखविंदर सिंह सुक्खु, भुपेश बघेल, भुपेंद्र हुड्डा, कुमारी शैलजा, रणदिपसिंह सूरजेवाला, कन्हैया कुमार आदी नेतेही प्रचारात उतरणार आहेत.