

Rahul Gandhi Press conference on vote chori :
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मत चोरी प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार अशी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. दरम्यान आज १८ सप्टेंबर रोजी राहुल गांधी हा हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे. आता हा हायड्रोजन बॉम्ब ठरतो की फुसका बार हे पत्रकार परिषद झाल्यावरच लक्षात येईल. राहुल गांधी यांची ही बहूप्रतिक्षित पत्रकार परिषद आज नवी दिल्लीत होणार आहे. याबाबतचं ट्विट काँग्रेसचे माध्यम विभागाचे चेअरमन पवन खेरा यांनी ट्विट करून दिली.
पवन खेरा यांनी ट्विट केलं की, 'आज सकाळी १० वाजता काँग्रेसचं मुख्यालय इंदिरा भवन इथं राहुल गांधी यांची पत्रकार परिषद होणार आहे.' दरम्यान, पवन खेरा यांनी राहुल गांधी हे कोणत्या विषयावर पत्रकार परिषद घेणार याचा खुलासा केलेला नाही.
राहुल गांधी यांनी बंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदार संघात २०२४ च्या लोकसभा निवडणूक मतदानावेळी घोळ झाल्याचा आरोप करत पहिली पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर अनेक गंभीर आरोप केले होते. आता ४० दिवसांनी त्यांची दुसरी पत्रकार परिषद होत आहे. भाजपनं घनटाबाह्य काम करत ही निवडणूक मतांची चोरी करून जिंकल्याचा आरोप त्यावेळी राहुल गांधी यांनी केला होता.
राहुल गांधी यांनी महादेवपुरामधील मतदानाचा घोळ हा अॅटम बॉम्ब आहे असं म्हणाले होते. त्यानंतर पटना येथे १ सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांनी आता आम्ही हायड्रोजन बॉम्ब टाकणार असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यानंतर देशाला तोंड दाखवू शकणार नाहीत असा दावा देखील केला होता.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेनंतर बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा देखील काढली होती. दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेबाबत काँग्रेसकडून अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र राहुल गांधी हे गुजरात आणि हरियाणा मधील काही मतदार संघातील मतदान घोळाबाबत माहिती देतील असं सांगण्यात येत आहे. तर काही जाणकारांच्या मते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदार संघ वाराणसी बाबत मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे.
यापूर्वी उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध निवडणूक लढवली होती. त्यांनी राहुल गांधी हे पुढचा गौप्यस्फोट हा वाराणसीबाबत करतील असा दावा केला होता. हायड्रोजन बॉम्ब हा वाराणसीत फुटण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती. मात्र त्यांनी याबाबत राहुल गांधी यांच्याशी कोणताही संवाद झाला नसल्याचं स्पष्टीकरण देखील दिलं होतं.