

नवी दिल्ली : जुन्या दिल्लीतील एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानाचे मालक आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष सध्याचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट झाली. दिवाळीच्या निमित्ताने ही खास भेट होती. यावेळी मिठाई दुकानाच्या मालकांनी चक्क राहुल गांधी यांना लग्न करण्यासाठी गळ घातला. ते म्हणाले, ‘गांधी घराण्याच्या अनेक पिढ्यांना आपण मिष्ठान्न सेवा पुरविली आहे. आता राहुल गांधीजी तुमच्या विवाहाची प्रतीक्षा करत आहे. या शुभ कार्यासाठी तुम्ही माझ्याकडूनच मिठाई घ्यावी,’ असे भावनिक अपेक्षा व्यक्त केली.
राहुल गांधी यांनी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर 'घंटेवाला मिठाई' दुकानाला भेट दिली. तिथे त्यांनी मिठाई बनविण्यात सहभाग घेतला. राहुल गांधी यांनी या भेटीचा व्हिडिओ सोमवारी (दि. 20) त्यांच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये मिठाईच्या दुकानाचे मालक असे म्हणताना दिसतात, ‘तुमचे आजोबा जवाहरलाल नेहरू, आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी आणि बहीण प्रियांका गांधी यांना आमच्या कडून मिठाई पुरवली गेली आहे. आता फक्त एकाच गोष्टीची प्रतीक्षा आहे, ती म्हणजे राहुल गांधींच्या लग्नाची.’
ते पुढे म्हणाले, ‘राहुलजी तुम्ही लग्नगाठ कधी बांधणार? या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. तुम्ही लवकरात लवकर लग्न करावे. त्यासाठीची मिठाईसुद्धा आपण आमच्याकडूनच तयार करून घ्या. आम्ही त्याची प्रतिक्षा करत आहोत.’ यावर राहुल गांधी यांनी कोणतेही उत्तर न देता केवळ स्मितहास्य केले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना म्हटले आहे की, ‘जुनी दिल्ली परिसरातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक घंटेवाला मिठाईच्या दुकानावर इमरती आणि बेसनचे लाडू बनविण्यात हात आजमावला. अनेक दशकांची परंपरा असलेल्या या जुन्या आणि प्रतिष्ठित दुकानाची गोडी आजही तशीच आहे... शुद्ध, पारंपरिक आणि हृदयस्पर्शी.’
त्यांच्या पोस्टमध्ये पुढे म्हटलंय की, ‘दिवाळीची खरी गोडी केवळ ताटात नसून, ती नात्यांमध्ये आणि समाजातही असते.’ यादरम्यान, राहुल गांधी यांनी देशवासीयांना आवाहन करताना, ‘आपण सर्वजण दिवाळी कशी साजरी करत आहात आणि तिला कशी विशेष बनवत आहात, हे सांगा.’