

नवी दिल्ली : ब्रिक्स शिखर परिषदेच्या गाला डिनरमध्ये केवळ शाकाहारी पदार्थांचा समावेश करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांनी रविवारी ‘एक्स’वर छोले-भटुऱ्यांचा फोटो पोस्ट करत भारतातील ८० टक्के लोक मांसाहारी असल्याचे म्हटले.
त्यांचे हे वक्तव्य ब्रिक्स नेत्यांसाठी आयोजित गाला डिनरच्या शाकाहारी मेन्यूशी जोडले जात आहे. राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये भारतातील मांसाहारी खाद्यपदार्थ अत्यंत चविष्ट असल्याचे म्हटले. तसेच त्यांच्या बहिणीने म्हणजेच प्रियंका गांधींनी बनवलेले छोले-भटूरेही तितकेच चविष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. पोस्टसोबत त्यांनी छोले-भटुऱ्यांचा फोटोही शेअर केला. या पोस्टनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या.
रिजिजूंचा राहुल गांधींना टोला
ब्रिक्स गाला डिनरच्या मेन्यूवरून राजकारण होत असल्याची टीका केंद्रीय मंत्री किरेण रिजिजू यांनी केली. ब्रिक्स देशांच्या नेत्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनाच्या मेन्यूवरही काँग्रेस राजकारण करत असल्याचे पाहून आश्चर्य वाटत असल्याचे त्यांनी म्हटले. भारताने आपल्या पाहुण्यांना चव आणि पोषणाने समृद्ध असे भारतीय शाकाहारी भोजन दिले असून, त्यामध्ये देशातील विविध प्रांतांच्या खाद्यपरंपरांचा समावेश होता, असे रिजिजू यांनी स्पष्ट केले.
गुच्छीपासून मिलेट पुलावपर्यंत
१२ सप्टेंबर रोजी भारत मंडपम येथे झालेल्या गाला डिनरमध्ये भारतीय खाद्यसंस्कृतीतील विविध पदार्थांचा समावेश होता. सुरुवातीला गुजराती खांडवीचे आधुनिक रूप असलेले खांडवी मिल-फेई देण्यात आले. त्यानंतर खुंब गलौटी कबाब, शीरमाल ब्रेड, पनीर लबाबदार आणि हिमाचली गुच्छी मशरूमपासून तयार केलेला ‘गुच्छी मार्मिक’ हे पदार्थ होते. मुख्य भोजनात मिलेट पुलाव, कॅरट-बीन पोरीयल, थक्काली बेळ्ळे सारू आणि बीटरूट रायता यांचा समावेश होता. मिठाईमध्ये जलेबीसोबत फ्रूट क्रीम देण्यात आली. या संपूर्ण मेन्यूमध्ये मांसाहारी पदार्थांचा समावेश नव्हता.