

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनामुळे देशातील बँकिंग क्षेत्र संकटात सापडले असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. त्यांनी एकदा बँकांनी १६ लाख कोटी रुपयांचे कॉर्पोरेट कर्ज माफ केल्याचा मुद्दाही उपस्थित केला. बँकांच्या लहान कर्मचाऱ्यांना त्याचा फटका सहन करावा लागत असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी संसद भवनात एका खाजगी बँकेच्या काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी हे आरोप केले आहेत. यासंबंधीचा व्हिडीओ त्यांनी एक्सवर पोस्ट केला.
राहुल गांधी म्हणाले की, भाजप सरकारने त्यांच्या अब्जाधीश मित्रांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. बँकिग कर्मचाऱ्यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर कामाच्या ठिकाणी छळ, जबरदस्तीने बदल्या, योग्य प्रक्रियेशिवाय नोकरीवरून काढून टाकणे, अशा समस्या समोर आल्याचे ते म्हणाले. यामुळे बँकिग कर्मचारी आत्महत्या देखील करत असल्याचे ते म्हणाले.
भाजप सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनाची मानवी किंमत मोजावी लागत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला. ही गंभीर चिंतेची बाब आहे जी देशभरातील हजारो प्रामाणिक काम करणाऱ्या व्यावसायिकांवर परिणाम करते. काँग्रेस पक्ष या कामगार वर्गातील व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी होणारा छळ व शोषण थांबवण्यासाठी हा मुद्दा गांभीर्याने घेईल, असे ते म्हणाले.