

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या आवारात एक अनोखे आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे मुखवटे काँग्रेस खासदारांनी लावले होते. या २ खासदारांची उपरोधित मुलाखत राहुल गांधींनी घेतली. दिवसभर या आंदोलनाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर सत्ताधारी पक्षाने राहूल गांधीवर सडकून टीका केली आहे. राहूल गांधी कॉमेडी किंग असल्याचा टोला धर्मेंद्र प्रधान यांनी लगावला आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक्सवर पोस्ट करुन राहुल गांधी यांच्यावर हा हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी जे उत्तम करतात तेच करत आहेत म्हणजे स्टँड-अप कॉमेडी!, असे प्रधान म्हणाले. पुन्हा एकदा राहूल गांधी देशातील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. २०१४ पासूनच्या निवडणुकांचे निकाल म्हणजे राहुल गांधींचा स्वीकार जनतेने केला नाही, याचा पुरावा आहे. राहुल गांधींचा प्रचार जनतेला रुचत नसल्याचा दावा धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे.