Rahul Gandhi BRICS Menu Row : "८०% भारतीय मांसाहारी..." ; BRICS मेजवानीतील शाकाहारी मेन्यूवरून राहुल गांधींचा PM मोदींना टोला

ब्रिक्स परिषदेच्या मेजवानीवरून रंगणार राजकीय कलगीतुरा; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Rahul Gandhi BRICS Menu Row
Rahul Gandhi BRICS Menu Row Pudhari
Published on
Updated on

Rahul Gandhi BRICS Menu Row : नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेच्या शाही मेजवानीतील पूर्णपणे शाकाहारी मेन्यूवरून काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "देशातील ८० टक्के जनता मांसाहारी आहे," असा दावा करत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टोला लगावला.

राहुल गांधींनी केला 'छोले भटुरे'चा फोटो शेअर

राहुल गांधी यांनी रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (X) वर उत्तर भारतीय खाद्यपदार्थ 'छोले भटुरे'चा फोटो शेअर करत लिहिले, "माहितीसाठी सांगतो: ८०% भारतीय मांसाहारी आहेत. भारतीय मांसाहारी खाद्यपदार्थ चविष्ट असतात. तसेच माझ्या बहिणीचे छोले-भटुरेही." त्यांनी डायनिंग टेबलवर ठेवलेल्या छोले-भटुरेचा फोटोही पोस्ट केला.

NFHS-5 चा रिपोर्ट काय सांगतो?

राहुल गांधी यांनी ८० टक्क्यांच्या या आकड्यासाठी कोणत्याही अधिकृत स्रोताचा संदर्भ दिलेला नाही. २०२३-२४ मध्ये झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात (NFHS-6) मांसाहाराबाबत अशी कोणतीही राष्ट्रीय आकडेवारी दिलेली नाही. मात्र, यापूर्वीच्या NFHS-5 (२०१९-२१) च्या अहवालानुसार, १५ ते ४९ वयोगटातील ८३.४ टक्के पुरुष आणि ७०.६ टक्के महिला कधी ना कधी मासे, चिकन किंवा मटणाचे सेवन करतात.

Rahul Gandhi BRICS Menu Row
BRICS Summit 2026 : PM मोदींनी आयोजित केलेल्‍या 'ब्रिक्स' स्नेहभोजनाला चीनचे अध्‍यक्ष शी जिनपिंग यांची दांडी!

खांडवी ते शाहतूत फिरणी! स्नेहभोजनात नेत्यांसाठी खास पदार्थांची रेलचेल

भारत मंडपम येथे आयोजित दोन दिवसीय ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसाठी खास रात्रीच्या जेवणाचे आयोजन केले होते. मेनूमध्ये खांडवी मिल-फ्युइल, खुंब गलोटी, पनीर लबाबदार, गुच्छी मार्मिक, कॅरट-बीन पोरियल आणि मिलेट पुलाव यांचा समावेश होता. गोड पदार्थांमध्ये जुन्या दिल्लीतील फ्रूट क्रीमसोबत जिलेबी आणि शाहतूत फिरणीचा समावेश होता. केंद्र सरकारच्या 'श्री अन्न' (Millet) आणि शाश्वत जीवनशैलीच्या आग्रहाला अनुसरून या मेन्यूमध्ये भरड धान्यापासून बनवलेल्या पदार्थांवर विशेष भर देण्यात आला होता.

Rahul Gandhi BRICS Menu Row
PM Modi BRICS Summit 2026 : जगात तणाव झपाट्याने वाढतोय, सामान्य माणसांवर गंभीर परिणाम; ब्रिक्स परिषदेत PM मोदींचे प्रतिपादन

भारताची सांस्कृतिक व खाद्यसंस्कृती मांडण्याचा प्रयत्न

परदेशी पाहुण्यांसमोर भारताची सांस्कृतिक व खाद्यसंस्कृती मांडण्याचा हा एक प्रयत्न होता. मात्र, अधिकृत मेजवानीच्या मेन्यूमधून मांसाहारी पदार्थ पूर्णपणे वगळण्यात आल्याकडे राहुल गांधी यांनी या पोस्टद्वारे लक्ष वेधले. यावरून सोशल मीडियावरही उलट-सुलट चर्चा सुरू असून, काहींनी या मेन्यूचे कौतुक केले आहे तर काहींनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारताच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली १८ वी ब्रिक्स शिखर परिषद रविवारी संपन्न झाली. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या मूळ देशांव्यतिरिक्त आता इजिप्त, इथिओपिया, इराण, यूएई, सौदी अरेबिया आणि इंडोनेशिया हे देशही या संघटनेचे पूर्णवेळ सदस्य आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news