नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी येत्या ५ सप्टेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. सांगली येथे स्व. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण या दोन्ही नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या विशेष निमंत्रणावरून हे दोन्ही नेते सांगलीत येणार असल्याचे समजते. या कार्यक्रमाला शरद पवारांसह काँग्रेसचे बडे नेतेही उपस्थित असणार आहेत.
मागील काही दिवसांपासून राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या चर्चा सुरु होत्या. तो दौरा मुंबईत असेल असे बोलले जात होते. मात्र २० ऑगस्टला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे मुंबई दौऱ्यावर होते. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५ सप्टेंबरला सोनिया गांधी आणि राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत. या दौऱ्यात सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या उपस्थितीत सांगलीतील कडेगाव येथे काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्यातील काँग्रेसचे सर्व प्रमुख नेतेमंडळी देखील उपस्थित राहणार असल्याचे समजते. सांगलीचे खासदार विशाल पाटील हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात हे काँग्रेसचे मोठे शक्ती प्रदर्शन असण्याची शक्यता आहे.