Raghuveer Khedkar | ....आणि ५ दिवसांचा असताना तमाशाच्या मंचावर आलो - रघुवीर खेडकर!

पद्मश्री प्रदान होण्याच्या पूर्वसंध्येला तमाशा कलावंत रघुवीर खेडकर दिल्लीतील सत्कार सोहळ्यात भावूक
Raghuveer Khedkar
तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा दिल्ली येथे मराठी बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला
Published on
Updated on

नवी दिल्ली : तमाशाच्या फडात बरीच वर्षे काम करत आहे. मात्र जन्म झाल्या झाल्या एक छोट्या पात्राच्या निमित्ताने पाचव्या दिवशी एक पात्र म्हणून मंचावर आलो, बघता बघता ४५ वर्षे निघून गेली आणि आजही या क्षेत्रात कार्य करत आहे, अशा भावना रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केल्या. पद्मश्री पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या पूर्वसंध्येला दिल्लीतील मराठी बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी मुलाखतीत ते बोलत होते. 

निवृत्त परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे, निवृत्त व्हाइस ऍडमिरल सतीश घोरमाडे, केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील अतिरिक्त सचिव आनंद पाटील, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, ज्येष्ठ पत्रकार अभिजित कांबळे, मयूर आहेर, प्राची गवांदे यांच्या उपस्थितीत रघुवीर खेडकर यांचा सत्कार समारंभ पार पडला. ज्येष्ठ पत्रकार डॉ. संतोष खेडलेकर यांनी या कार्यक्रमात रघुवीर खेडकर यांची मुलाखत घेतली. 

मुलाखतीदरम्यान, फड, गवळण, बतावणी, वग या सगळ्या गोष्टी म्हणजे काय यावर रघुवीर खेडकर यांनी सविस्तर भाष्य केले. तमाशामध्ये हेलिकॉप्टर आणणे, नवनव्या गोष्टी साकारणे यामागची भूमिका त्यांनी मांडली. आयुष्यात आई, बायको अशी जवळची मंडळी अकाली देवाघरी गेली त्यामुळे दुःख असताना तमाशात सोंगाड्या म्हणून हसत राहिलो आणि आजही हसतो आहे. आई म्हणायची "लोक तमाशा पाहायला येतात म्हणजे त्यांच्या आयुष्यातील दुःख विसरायला येतात. त्यामुळे आपलं दुःख विसरून त्यांना हसवायचं असतं." तिचे ते शब्द आठवतात, प्रेरणा देतात. जीवन आहे, शेवटी पुढे जायचे आहे, अशा भावना रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केल्या. दिल्लीत झालेल्या हृदय सत्कारासाठी त्यांनी सर्व दिल्लीकर मराठी बांधवांचे मनापासून आभार व्यक्त केले. दिल्लीस्थित मराठी अधिकारी, पत्रकार, व्यावसायिक, विद्यार्थी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. 

तमाशा महामंडळ होणे आवश्यक 

मुलाखतीदरम्यान बोलताना रघुवीर खेडकर म्हणाले की, अद्याप तमाशा पट आला नाही. तमाशाच्या संवर्धनासाठी तमाशा महामंडळ होणे आवश्यक आहे. तमाशाला विविध पातळीवर संरक्षण मिळणेही आवश्यक आहे. या काही गोष्टी झाल्यास तमाशा आणखी जोमाने नव्या पिढीपर्यंत पोहोचेल आणि नवी पिढी देखील यामध्ये सहभागी होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news