Mobile Recharge | मोबाईल रिचार्ज संपल्यानंतरही इनकमिंग सुरू असावे; राघव चढ्ढा यांची राज्यसभेत मागणी

२८ दिवसांच्या प्लॅनवरही प्रश्नचिन्ह केले उपस्थित, देशात १२५ कोटी मोबाईल वापरकर्ते
Mobile Recharge
राघव चढ्ढा
Published on
Updated on

नवी दिल्ली : मोबाईल रिचार्ज संपल्यानंतर इनकमिंग कॉल आणि एसएमएस बंद होण्याच्या मुद्द्यावर आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी राज्यसभेत आवाज उठवला. त्यांनी प्रीपेड मोबाईल ग्राहकांच्या अडचणी मांडत दूरसंचार कंपन्यांच्या रिचार्ज धोरणावर प्रश्न उपस्थित केले.

भारतामध्ये सुमारे १२५ कोटी मोबाईल वापरकर्ते असून त्यापैकी जवळपास ९० टक्के ग्राहक प्रीपेड रिचार्जवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत रिचार्जची वैधता संपल्यानंतर इनकमिंग कॉल आणि एसएमएसही बंद होणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. रिचार्ज संपल्यावर आउटगोइंग कॉल बंद होणे समजण्यासारखे असले तरी इनकमिंग कॉल बंद झाल्यास नागरिकांशी संपर्क तुटतो. त्याचबरोबर बँक ओटीपीसारखे महत्त्वाचे संदेशही मिळत नाहीत, त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिक पूर्णपणे संपर्कविहीन होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर त्यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या. शेवटच्या रिचार्जनंतर किमान एक वर्ष इनकमिंग कॉल आणि एसएमएस सुरू ठेवावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मोबाईल क्रमांक शेवटच्या रिचार्जनंतर किमान तीन वर्षे बंद करू नये, अशीही सूचना त्यांनी केली. याशिवाय केवळ इनकमिंग कॉल, ओटीपी आणि सरकारी सेवांसाठी वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी कमी किमतीचा “इनकमिंग-ओन्ली” प्लॅन सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, २८ दिवसांच्या रिचार्ज प्लॅनवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. एखाद्या प्लॅनला ‘मासिक’ म्हटले जात असताना तो ३० किंवा ३१ दिवसांचा असणे अपेक्षित आहे. मात्र २८ दिवसांच्या चक्रामुळे ग्राहकांना वर्षभरात प्रत्यक्षात १३ वेळा रिचार्ज करावा लागतो, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दूरसंचार कंपन्यांनी रिचार्ज योजना कॅलेंडर महिन्याशी सुसंगत कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. आजच्या काळात मोबाईल फोन ही चैनीची वस्तू नसून नागरिकांसाठी अत्यावश्यक साधन बनले आहे. त्यामुळे प्रीपेड ग्राहकांना न्याय आणि पारदर्शकता मिळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news