पुणे महिला अत्याचार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल
नवी दिल्ली : पुणे महिला अत्याचार प्रकरणाची स्युमोटो दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पत्र लिहिले आहे आणि तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पुणे महिला अत्याचार प्रकरणामध्ये संबंधित आरोपीला लवकरात लवकर अटक करून पीडितेला न्याय देण्यात यावा, अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. सदर प्रकरणात कारवाई योग्य कालावधीत आणि पारदर्शकपणे पार पडली पाहिजे. यादरम्यान पीडितेला सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात यावी, हे करत असताना पीडीतेची सुरक्षितता आणि समुपदेशन याची काळजी घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलिसांकडून मागवला कारवाईचा अहवाल
पुणे महिला अत्याचार प्रकरण घडल्यानंतर पोलिसांनी काय कारवाई केली, तपास कसा सुरू आहे, यासंदर्भातील अहवाल राष्ट्रीय महिला आयोगाने मागवला आहे. तीन दिवसांच्या आत हा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

