

नवी दिल्ली : आपापल्या घरातून नाशिकपर्यंत सर्वजण एसटी बसने आले. पुढे नाशिकपासून रेल्वे प्रवासाचा अनुभव घेतला. परतीचा प्रवास मात्र त्यांनी थेट विमानातूनच केला. चार दिवसांत एसटी बस.. रेल्वे आणि विमान असा हा प्रवास तोही राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, केंद्रीय आयोगाचे अध्यक्ष अशा विविध व्हीव्हीआयपी लोकांचा सहवास, ताजमहाल, लाल किल्ला, इंडिया गेट अशा प्रसिद्ध ठिकाणांना भेटी देत झाला. या सर्वांने आदिवासी पाड्यातील हे विद्यार्थी मात्र अक्षरशः भारावून गेले.
'पुढारी टॅलेंट सर्च' परीक्षेच्या माध्यमातून आदिवासी विभागातील मुलांनी दिल्ली दर्शन केले. हा सर्व स्वप्नवत वाटावा असा प्रवासात अविस्मरणीय अशा आठवणी आणि मनोरंजनाची शिदोरी घेऊन हे विद्यार्थी नाशिकला परतले. ज्यांनी आजवर एसटी बसमधून प्रवास केला, त्या सर्व मुलांना थेट विमान प्रवासाची संधी दैनिक 'पुढारी'ने उपलब्ध करून दिली. दिल्ली ते नाशिक प्रवास सकाळी साडेपाच वाजता सुरू होणार होता. कधी एकदा विमानात बसू, या एकच विचाराने अनेक विद्यार्थी रात्रभर झोपलेही नाहीत. रात्रभर विमान प्रवासाची उत्सुकता होती. दिल्ली पोहोचल्यानंतर विमानतळावर विमानतळाची भव्यता, तेथील वातावरण अशा प्रत्येक गोष्टींविषयीची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी वेगळाच अनुभव घेत होते. प्रत्यक्ष विमानात बसताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद अक्षरशः ओसंडून गेला होता. विमान हवेत जेव्हा झेपावले तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. इवल्याशा डोळ्यातून आकाश आणि धरती नजरेत सामावताना, नव्या भविष्याचा वेध घेत, चेहऱ्यावरून दैनिक 'पुढारी'बाबत कृतज्ञतेचे भाव प्रकट करत हे सर्व विद्यार्थी नाशिकच्या विमानतळावर आले.