

पुढारी ऑनलाईन डेस्क: वक्फ सुधारणा विधेयकाला संसदेत मंजुरी मिळाल्यानंतर शुक्रवारी देशातील विविध ठिकाणी मुस्लीम समुदायाने या विधेयकाविरोधात निदर्शने केली. मुस्लिम समुदायाच्या साप्ताहिक नमाजपठणानंतर कोलकाता, चेन्नई आणि अहमदाबादमध्ये शुक्रवारी हजारो लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी हे विधेयक मुस्लीमविरोधी असल्याचे म्हणत निदर्शने केली.
वक्फ सुधारणा विधेयक प्रथम लोकसभेत 288 विरूद्ध 232 मतांनी पारित झाले. नंतर राज्यसभेत 128 विरूद्ध 95 मतांनी मंजूर झाले आहे.
कोलकाता येथे मोठा जमाव तिरंगा ध्वज घेऊन निदर्शनांत सामिल झाला. वक्फ सुधारणा, वक्फ विधेयकाला नकार अशा पोस्टर्ससह आंदोलक या निदर्शनात सहभागी झाले. 'वक्फ संरक्षण संयुक्त मंच' ने आंदोलनाचे आयोजन केले होते.
अहमदाबादमधील निदर्शनांमध्ये एएनआयने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये पोलिस रस्त्यावर बसलेल्या वयोवृद्ध निदर्शकांना जबरदस्तीने उठवताना दिसून येतात. पोलिसांनी मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पार्टीच्या राज्याध्यक्षास आणि त्यांच्या 40 सदस्यांना ताब्यात घेतले.
चेन्नईमध्येही अशीच दृश्ये पाहायला मिळाली. येथे अभिनेता थलपती विजय याच्या 'तमिळगा वेत्री कझगम' ने राज्यव्यापी विरोध प्रदर्शनाची घोषणा केली होती. TVK चे कार्यकर्ते चेन्नई आणि कोयंबतूर, तिरुचिरापल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये एकत्र आले आणि त्यांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली.
विजय यानेही हे विधेयक लोकशाही विरोधी असल्याचे म्हटले आहे. हे विधेयक मंजूर झाल्याने भारताच्या धर्मनिरपेक्ष मूलभूत तत्त्वांवर प्रश्न उपस्थित झाल्याचे त्याने म्हटले आहे.