

लखनौ; वृत्तसंस्था : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या कौटुंबिक मालकीच्या जमिनीचा लिलाव सुरू झाला आहे. भारत सरकारच्या शत्रू संपत्ती नियमानुसार उत्तर प्रदेश सरकारने ही कारवाई सुरू केली असून, 5 सप्टेंबर 2024 पर्यंत ही प्रक्रिया चालेल. ही जमीन 2 हेक्टर असून, ती उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील कोताना गावात आहे. गावात मुशर्रफ यांचा वडिलोपार्जित वाडाही आहे.
मुशर्रफ यांची आई जरीन मुशर्रफ यांनी 2001 मध्ये भारताला भेट दिली होती, पण तेव्हाही जरीन यांचे गावाला भेट देणे झाले नव्हते. या गावात बांधलेल्या वाड्यात मुशर्रफ यांची आई नववधू म्हणून आली होती. वाडा आधीच विकला गेला आहे.
दहा वर्षांपूर्वीपर्यंत ही जमीन गावातीलच बनारसी दास आणि नंतर त्यांचे पुत्र कसत होते. पुढे प्रशासनाने जमीन ताब्यात घेतली. आता लिलावात काढली आहे. परवेझ मुशर्रफ यांचे भाऊ हुमायू, त्यांची बहीण सुलताना, जाखिया गावात येत असत. मुशर्रफ यांचे आई-वडील कोताना सोडल्यानंतर दिल्लीतील चांदनी चौकात नाहरवाली वाड्यामध्ये भाड्याने राहिले. पुढे त्यांनी हा वाडाही विकत घेतला. 1947 नंतर वाडा विकून ते पाकिस्तानात गेले. सध्या या वाड्यात एक जैन कुटुंब राहाते. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना 2001 मध्ये परवेझ मुशर्रफ हे कुटुंबासह भारतात आले होते.