Priyanka Chaturvedi: उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचण्याआधीच खा.प्रियंका चतुर्वेदी मोदींच्या भेटीला; राजकीय वर्तुळात खळबळ, चतुर्वेदींनी दिले स्पष्टीकरण

Priyanka Chaturvedi PM Modi meeting: 'पंतप्रधान यांच्यासोबत झालेली भेट राजकीय नव्हती, ती भेट सहज होती. यावेळी महाराष्ट्र आणि राजकारणाच्या अनुषंगाने काहीही चर्चा झाली नाही, या भेटीचा राजकीय अर्थ लावण्याचा काहीही अर्थ नाही, 'असे ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले आहे.
Priyanka Chaturvedi
Priyanka ChaturvediPudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, ही भेट पूर्णपणे 'सहज' होती आणि तिचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्टीकरण चतुर्वेदी यांनी दिले आहे.

'इंडिया' आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी आणि उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते, ज्यावर आता स्वतः चतुर्वेदी यांनी पडदा टाकला आहे. सोमवारी (दि.४) पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी आपण खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध राजकीय विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नाही; खासदार चतुर्वेदी

पंतप्रधान मोदींसोबत झालेली भेट ही राजकीय नव्हती, असे उबाठा पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ठामपणे सांगितले आहे. "पंतप्रधान यांच्यासोबत माझी चांगली चर्चा झाली. मात्र, यामध्ये महाराष्ट्राच्या अनुषंगाने किंवा इतर कोणताही राजकीय संवाद झाला नाही. त्यामुळे या भेटीचा राजकीय अर्थ लावण्यात काहीही तथ्य नाही," असेही त्या म्हणाल्या. उद्धव ठाकरे 'इंडिया' आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत येत असतानाच ही भेट झाल्याने तिला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

भाषेवरून राजकारण...! 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत होणार चर्चा

दिल्लीत होणाऱ्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीसंदर्भातही त्यांनी माहिती दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आघाडीतील नेत्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. काँग्रेस हा आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांची भूमिका महत्त्वाची असेल. महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाची भूमिका काय होती, हे सर्वांनी पाहिले आहे. देशात आता धर्म आणि जातीच्या राजकारणासोबतच भाषेवरून राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे, यावरही बैठकीत चर्चा होऊ शकते. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भातही आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल, असे संकेत त्यांनी माध्यमांशी बोलताना दिले.

'दोन्ही भाऊ एकत्र...'; राज ठाकरेंच्या भूमिकेवर सूचक विधान

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल विचारले असता, त्यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना उत्तर देण्याची गरज नसल्याचे म्हटले. "राज ठाकरे यांनी दुबे यांना आधीच उत्तर दिले आहे. दुबे यांना आता येणारी वेळच उत्तर देईल," असे त्या म्हणाल्या. यावेळी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर त्यांनी सूचक विधान केले. "दोन्ही भाऊ एकत्र येऊन निवडणूक लढवल्यास काय परिणाम होतील, हे दिसेल. आम्ही वातावरण पाहिले आहे. छगन भुजबळ यांनीही दोन्ही नेते एकत्र आल्यास काय परिणाम होतील, याबाबत विधान केले आहे," असे सांगत त्यांनी या चर्चेला आणखी खतपाणी घातले.

महाराष्ट्राच्या राजकारणाची दिल्लीत खलबतं

देशाच्या राजधानीतील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. एकाच वेळी दोन कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी, उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिल्लीत दाखल होत असल्याने राजधानीतील घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे 'इंडिया' आघाडीच्या बैठकीसाठी बुधवारी (दि.५) दिल्लीत पोहोचत असतानाच, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (दि.५) रात्रीच दिल्लीत दाखल होत आहेत. या राजकीय योगायोगामुळे चर्चांना उधाण आले असून, त्यातच ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान मोदींची घेतलेली 'सहज' भेट या घडामोडींना नवी किनार देत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news