

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधातील काँग्रेसने राज्यसभेत आणलेला विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळून लावला. गृहमंत्र्यांनी कोणतेही उल्लंघन केलेले नाही, असे राज्यसभा सभापती म्हणाले. काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्यावर अमित शाह यांनी आरोप केल्याबद्दल काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी हा प्रस्ताव आणला होता.
राज्यसभेच्या कार्यपद्धती आणि कामकाजाच्या आचारसंहितेच्या नियम १८८ अंतर्गत विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणता येतो. गृहमंत्र्यांनी चर्चेदरम्यान सोनिया गांधींचे नाव घेतले नसले तरी, त्यांनी त्यांच्या पदाचा उल्लेख केला आणि पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीच्या कामकाजाबाबत आरोप केले, असे प्रस्तावामध्ये म्हटले होते. काँग्रेसने गृहमंत्र्यांवर सोनिया गांधींची प्रतिष्ठा खराब करण्याचा आरोप केला होता.
काँग्रेसच्या प्रस्तावावर राज्यसभा सभापती धनखड म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापन विधेयक २०२४ वरील चर्चेला उत्तर देताना काही विशिष्ट टिप्पण्या केल्यानंतर अमित शाह यांनी त्यांचे विधान प्रमाणित केले आहे. गृहमंत्र्यांनी २४ जानेवारी १९९८ रोजी भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने जारी केलेल्या प्रेस स्टेटमेंटचा हवाला दिला. यामध्ये, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पीएमएनआरएफ सुरू करण्याची घोषणा केली होती. पंतप्रधान, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आणि काही इतरांचा समावेश असलेल्या समितीद्वारे याचे व्यवस्थापन केले जाणार होते.