पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधील अमरेली येथे एका पायलट प्रशिक्षण केंद्राचे खासगी विमान आज (दि.22) कोसळले. या दुघटनेत एका वैमानिकाचा मृत्यू झाला. विमान झाडाला धडकले. यानंतर मोकळ्या जागेवर कोसळले. अपघातानंतर मोठा स्फोट झाला आणि परिसरात घबराट पसरली.अग्निशमन दल आणि पोलिस पथके घटनास्थळी दाखल झाली आणि बचाव कार्य सुरू केले. रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी परिसराला वेढा घातला गेला.
. "अमरेली येथील व्हिजन फ्लाइंग इन्स्टिट्यूटचे एक प्रशिक्षण विमान आज दुपारी १२.३० च्या सुमारास शास्त्री नगर परिसरात कोसळले. विमान अनिकेत महाजन चालवत होते. त्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे," अशी माहिती पोलीस उपअधीक्षक चिराग देसाई यांनी दिली. गेल्या महिन्यात गुजरातमधील प्रशिक्षण विमानाशी संबंधित ही दुसरी घटना आहे. मार्चमध्ये, मेहसाणा जिल्ह्यातील एका गावाच्या बाहेरील भागात एका फ्लाइंग स्कूलचे आणखी एक प्रशिक्षण विमान कोसळले हाेते.
३१ मार्च रोजी, मेहसाणाजवळील उचरपी गावात एका खाजगी विमान संस्थेचे प्रशिक्षण विमान क्रॅश-लँडिंग झाल्याने एक महिला प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी झाली. मेहसाणा तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक डीजी बडवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना तांत्रिक कारणांमुळे घडली. यापूर्वी, ३ एप्रिल रोजी, भारतीय हवाई दलाचे एक जग्वार लढाऊ विमान नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान जामनगरजवळ कोसळले. या अपघातात हरियाणातील रेवाडी येथील २८ वर्षीय फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांचा मृत्यू झाला होता.