

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर (PM Modi Maharashtra visit) येणार आहेत. यावेळी ते भारतीय नौदलाच्या आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर या नौदल युद्धनौका राष्ट्रार्पण करतील. मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास या युद्धनौकांचे राष्ट्रसमर्पण पंतप्रधान मोदी करणार आहेत. त्यानंतर ते नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे (ISKCON temple) उद्घाटन दुपारी साडेतीनच्या सुमारास करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात येणाऱ्या नौदलाच्या तीन प्रमुख युद्धनौकांमुळे सागरी सुरक्षेमध्ये वाढ होणार आहे. आयएनएस सूरत हे पी१५बी मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक प्रकल्पाचे चौथे आणि शेवटचे जहाज आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक हे जहाज आहे. यातील ७५ टक्के सामग्री स्वदेशी आहे. आयएनएस निलगिरी, हे पी१७ए स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिले जहाज असून भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन विभागाने त्याची निर्मिती केली आहे. तसेच त्यात उत्कृष्टपणे संकटकाळी तगून रहाण्याची क्षमता असून सागरी सुरक्षा आणि स्टील्थसाठी प्रगत वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. आयएनएस वाघशीर, पी७५ स्कॉर्पीन प्रकल्पाची सहावी आणि अंतिम प्रकारातील पाणबुडी आहे. फ्रान्स नौदलाच्या समूहाच्या सहकार्याने तिची बांधणी करण्यात आली आहे. या तिन्ही युद्धनौकांमुळे भारतीय नौदल अधिक सुसज्ज होणार आहे.
तसेच पंतप्रधान राधा मदनमोहनजी मंदिर, खारघर येथील इस्कॉन प्रकल्पाचेही उद्घाटन करतील. नऊ एकरांवर वसलेल्या या प्रकल्पात अनेक देवदेवतांची मंदिरे, वैदिक शिक्षणाचे केंद्र, प्रस्तावित वस्तुसंग्रहालय, सभागृह, आणि उपचार केंद्र यांचा समावेश आहे. विश्वबंधुत्व, शांतता आणि सौहार्द वाढवणे हे वैदिक शिक्षण केंद्राचे उद्दिष्ट आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात मुंबईमध्यचे महायुतीच्या आमदारांसोबत स्नेहभोजन करणार असून त्यांच्याशी ते संवाद साधणार असल्याचे समजते. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे पंतप्रधान मोदींचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.