

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ‘देशातील तरुण मोठी स्वप्ने पाहत असून ती पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत; मात्र अमली पदार्थांचे व्यसन त्यांच्या या स्वप्नांसमोरील सर्वात मोठे आव्हान बनले आहे,’ अशी चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. २९) आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १४० व्या भागात व्यक्त केली. व्यसनाविरोधात समाजात जागृती वाढत असून ‘नशामुक्त युवा अभियाना’ला गती मिळत असल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील एका व्यसनमुक्त झालेल्या तरुणाशी थेट संवाद साधला. इयत्ता दहावीत असताना मित्रांच्या संगतीने सुरू झालेल्या व्यसनामुळे आई, आजी आणि संपूर्ण कुटुंब गमवावे लागल्याचा वेदनादायी अनुभव त्या तरुणाने सांगितला. पुनर्वसन केंद्रातून तीन वेळा पुन्हा व्यसनाकडे वळल्यानंतरही केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याने व्यसनावर मात केली. पंतप्रधान मोदी यांनी त्याचे कौतुक करत, ‘इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही; तुम्ही आता इतरांनाही यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा,’ असे आवाहन केले.
६५० गुणांचे मूल्यमापन
या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील २० प्रशासकीय विभागांवर जबाबदारी सोपवण्यात आली असून, ६ प्रमुख मुद्द्यांवर आधारित २१ कृती मुद्दे निश्चित करण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय ‘एनकॉर्ड’ समित्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी ४० निकष आणि एकूण ६५० गुणांची प्रणाली (परफॉमन्स मॅट्रिक्स) तयार करण्यात आली आहे. प्रत्येक विभागाच्या कामाचे नियमित मूल्यमापन केले जाईल. चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. या कामात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा कडक इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.