Dharmendra Pradhan | नीट पेपरफुटी, सीबीएसईप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांवर टांगती तलवार

तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप; विरोधी पक्ष आक्रमक
Dharmendra Pradhan |
Dharmendra Pradhan | नीट पेपरफुटी, सीबीएसईप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांवर टांगती तलवार
Published on
Updated on

प्रथमेश तेलंग

नवी दिल्ली : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या नीटचा पेपर फुटल्यानंतर देशातील शिक्षणव्यवस्थेवर पुन्हा एकदा जोरदार टीका होत आहे. त्यातच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) संकेतस्थळ तांत्रिक अडचणीत सापडले आहे. यामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रासाचा सामना करावा लागला. परिणामी, देशभरातून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

3 मे रोजी नीटचा पेपर झाला; मात्र हा पेपर अगोदरच फुटला असल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली. यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने याची तपासणी करायचे ठरवले. तपासणीत पेपरफुटी झाले असल्याचे निदर्शनास आले. म्हणून केंद्र सरकार आणि परीक्षा आयोजन राष्ट्रीय चाचणी संस्था म्हणजेच एनटीएने नीटचा पेपर रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. पेपरफुटी प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे सोपवण्यात आला. राजस्थान, हरियाणापासून सुरू झालेल्या या प्रकरणाचे महाराष्ट्रात व्यापक धागेदोरे असल्याचे स्पष्ट झाले.

आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणी सुरू झाल्या आहेत. सर्व्हर क्रॅश, पुनर्मूल्यांकन शुल्कातील असामान्य चढ-उतार (उदा. 69,420 रुपयांपर्यंतचे शुल्क दर्शवणे), पेमेंट गेटवेमधील बिघाड आणि नवीन ‘ऑनस्क्रीन मार्किंग’ प्रणाली अंतर्गत स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका पाहण्यातील त्रुटी, अशा अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. यामुळे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी मानसिक तणावात आहेत. या अडचणी सोडवण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी आयआयटी मद्रासची मदत घेतली असून चार बँकांच्या वरिष्ठांशी चर्चादेखील केली.

या दोन्ही प्रकरणांवरून काँग्रेससह विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. विद्यार्थी संघटनांसह सामान्य नागरिकांकडून शिक्षणमंत्र्यांवर रोष व्यक्त केला जात आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाची ही पहिलीच वेळ नाही. 2024 मध्ये देखील अशीच नीट पेपरफुटी झाली होती.

मंत्रिमंडळ विस्तारात धर्मेंद्र प्रधानांचे खाते जाणार?

केंद्र सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे समजते. यामध्ये नवीन चेहर्‍यांना संधी मिळणार आहे, काही मंत्र्यांचे खाते काढून घेतले जाईल, असे बोलले जात आहे. दोन्ही प्रकरणांबद्दलचा रोष लक्षात घेता धर्मेंद्र प्रधान यांचे शिक्षण मंत्रालय काढून घेतले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news