

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आणि आदिवासी गौरव दिनानिमित्त संसद भवन संकुलात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही पुष्पांजली वाहिली.
यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, आदिवासी अस्मिता आणि संस्कृतीची शान असलेल्या उलगुलानचे प्रणेते भगवान बिरसा मुंडा यांचे १५० वे जयंती वर्ष आजपासून सुरू होत आहे. या आदिवासी गौरव दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. ते म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा हे महान वीर होते त्यांनी देश, समाज आणि संस्कृतीसाठी सर्वस्व अर्पण केले. त्यांचे जीवन आपल्याला नेहमीच आदर्श आणि प्रेरणा देत राहतील.
दरम्यान, २०२१ पासून १५ नोव्हेंबर हा आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा केला जातो, जेणेकरून आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा सन्मान केला जाऊ शकतो. अनेक क्रांतिकारी चळवळींद्वारे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समुदायांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ब्रिटीश राजवटीविरुद्ध उलगुलान (क्रांती) चे नेतृत्व करणारे भगवान बिरसा मुंडा हे प्रतीक बनले. भगवान मुंडा यांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रीय प्रबोधन झाले आणि त्यांच्या योगदानाचे आदिवासी समाजाने आदरपूर्वक स्मरण केले.