

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पंचायत पुरस्कार वितरण कार्यक्रम ११ डिसेंबरला पार पडणार आहे. राजधानी दिल्लीस्थित विज्ञान भवनात हा कार्यक्रम होईल. महाराष्ट्रातील जवळपास ६ पंचायत राज संस्थांना या कार्यक्रमांमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येतील. या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह केंद्रीय पंचायतराज मंत्री राजीव रंजन सिंह तसेच पंचायतराज विभागाचे राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल, या विभागाचे सचिव विवेक भारद्वाज उपस्थित राहतील.
या कार्यक्रमाला देशभरातील मान्यवर, वरिष्ठ अधिकारी आणि पंचायत प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात पंचायत राजशी संबंधित विविध श्रेणीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येतील. महाराष्ट्रातील नाशिक, सातारा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांमधील ६ पंचायत राज संस्थांना संस्थांना पुरस्कार मिळणार आहेत.