

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्व स्वीकारलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याची ताजी घटना उघडकीस आली आहे. एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील एका तरुण आदिवासी गरोदर महिलेला सहा किलोमीटरची पायपीट करूनही जीव गमवावा लागला आहे. तिच्यासोबत पोटातील बाळाचाही करुण अंत झाला आहे.
एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील आशा संतोष किरंगे (वय 24) ही आदिवासी महिला नऊ महिन्यांची गर्भवती होती. गावाला जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून दुसरा रस्ता नसल्याने जंगलातील खाचखळगे तुडवत पायवाटेनेच जावे लागते. गावात प्रसूतीची कुठलीही शासकीय सुविधा नाही. त्यामुळे 1 जानेवारीला आशा किरंगे आणि तिचा पती संतोष यांनी सहा किलोमीटर अंतरावरील पेठा हे तिच्या बहिणीचे गाव पायी गाठले. परंतु, चालण्यामुळे दुसर्या दिवशी सकाळी तिला प्रसववेदना सुरू झाल्या. तिला तत्काळ रुग्णवाहिकेने हेडरी येथील माँ कालीअम्मल इस्पितळात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सिझर करण्याचा निर्णय घेतला. परंतु, तोपर्यंत पोटातच बाळ दगावले होते. काही वेळाने वाढलेल्या रक्तदाबामुळे आशानेही प्राण सोडला.त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तेथे स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्याने पुन्हा 40 किलोमीटरवरील अहेरी येथे पाठविण्यात आले. त्यानंतर तिचे शवविच्छेदन करण्यात आले.
सीईओ, डीएचओंची भेट
घटनेनंतर शनिवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी तोडसा येथे भेट देऊन माहिती जाणून घेतली.