

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रयागराजमधील त्रिवेणी संगम येथे महाकुंभमेळ्यात आज महाशिवरात्रीच्या शेवटच्या महास्नानात सहभागी होण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सकाळी ६ वाजेपर्यंत ४० लाखांहून अधिक लोकांनी स्नान केले. अंतिम स्नानात सहभागी होणाऱ्या भाविकांवर फुलांचा वर्षाव केला जात आहे. आतापर्यंत ६५ कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले आहे.
महाकुंभमेळ्यात महाशिवरात्रीला स्नान करण्यासाठी लाखो पावले पवित्र संगमाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. महाकुंभात गंगा, यमुना आणि सरस्वती (गुप्त) या नद्यांच्या पचित्र संगमात स्नान करून पुण्यसंचय करण्याचा दृढनिश्चय या भाविकांनी केला आहे. जगभरातील सर्वात मोठ्या भाविकांच्या मेळयाची या पर्वाची अखेर महाशिवरात्रीच्या स्नानाने होत आहे. त्यामुळे कोणत्याही दुर्घटनेचे गालबोट लागू नये म्हणून प्रशासन डोळ्यात तेल घालून 'जागते रहो 'च्या भूमिकेत आहे. संगम घाटावर भाविकांची झुंबड आहे. त्यामुळे आलेल्या लाखो भाविकांना नजिकच्या अन्य घाटांवर स्नान करूनही पुण्यसंचय करता येईल, असं सांगण्यात येत आहे.
हा १२ वर्षांनी येणारा महाकुंभ पौष पोर्णिमेला म्हणजे १३ जानेवारीला सुरू झाला. त्याचा समारोप महाशिवरात्रीला म्हणजे आज बुधवारी होईल. या पवित्र काळात तब्बल ६४ कोटी भाविकांनी स्नानाची पर्वणी साधली. प्रत्येक अमृतस्नानात (शाही स्नान) जवळपास अडीच कोटी भाविक सहभागी झाले. महाशिवरात्रीच्या शेवटच्या स्नानोत्सवात स्नान करण्यासाठी मोठी गर्दी आहे. आज संगमावर पवित्र स्नान करणाऱ्या भाविकांची संख्या ६६ कोटींचा आकडा ओलांडेल, असा अंदाज आहे.