

नवी दिल्ली : ठाकरे गटातील केवळ खासदार नव्हे तर आमदार देखील अस्वस्थ आहेत. ज्या तक्रारी काही वर्षांपूर्वी आमच्या होत्या त्या आज ठाकरे गटातील लोकांच्या आहेत, असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांनी केले आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये अस्वस्थता असल्याचा दावा केला. ठाकरे गटात नेत्यांना कोणी विचारत नाही, वरिष्ठ नेते कोणाशी संवाद साधत नाही. त्याचे शल्य तिकडच्या लोकांच्या मनात आहे असेही जाधव म्हणाले. विशेष म्हणजे ठाकरेंना आश्चर्य वाटेल असे लोक आमच्या बाजूला येऊ शकतील. कारण तिकडे काही नवे खासदार आहेत. त्यांना संसदेत संधीच मिळत नाही, असे म्हणत काहीतरी संवाद होत असल्याचे सुचवले.
गेल्या काही दिवसात ऑपरेशन टायगरच्या संदर्भात सुरू असलेल्या चर्चासंदर्भात विचारले असता जाधव म्हणाले की, ही चर्चा नवीन नाही. अलीकडेच माझ्या घरी सर्व खासदारांना स्नेहभोजनाला निमंत्रित केले होते, त्यानंतर या चर्चेला अधिकच बहर आला. मात्र माझ्या घरी दरवर्षीच महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांना स्नेहभोजनाला निमंत्रित केले जाते. राज्यातून दिल्लीत येणारे लोकप्रतिनिधी म्हणून आमचे एकमेकांशी अनेक वर्षांपासून संबंध आहे. सुख दुःखात सहभागी होणे ही आपली संस्कृती आहे. उद्या ठाकरेंच्या खासदारांनी आम्हाला जेवायला बोलावले तर आम्ही जेवायला जाऊ. जेवायला जाण्यात गैर काय? कोणी पक्षबदलाच्या चर्चा सर्वपक्षीय खासदारांसमोर जेवताना करतात का? असा प्रश्न विचारला आणि स्नेहभोजनामुळे काहींना अडचण होते. त्यामुळे ठाकरे गट पक्ष आज जो काही आहे तो देखील लवकरच संपल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर झालेल्या एका बैठकी संदर्भातही त्यांनी भाष्य केले. मंत्री जाधव म्हणाले की, मातोश्रीवर झालेल्या बैठकीत खासदारांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त मी माध्यमांमध्ये पाहिले. मी १९८६ पासून बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आज आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. कोणाला काय हवं नको, बरं वाईट विचारलं जातं. त्यामुळे ठाकरेंच्या लोकांना आमच्यासोबत यायला काही हरकत नाही. आमच्याकडे त्यांचे स्वागत आहे. अनेक नेते त्यांचे अस्वस्थ आहेत, त्यामध्ये अरविंद सावंत देखील असू शकतील. मात्र माझा त्यांच्याशी संवाद झालेला नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले.
उत्तर प्रदेशातील गाजीपुर येथे एका प्रवासी बसचा अपघात झाला. या बसमधील बहुतांश प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील होते. याबाबत भाष्य करताना मंत्री जाधव म्हणाले की, बुलढाणा येथून २ खाजगी ट्रॅव्हल्स नेपाळकडे जात होत्या. उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे एका बसचा मोठा अपघात झाला. ४७ प्रवासी त्यात होते, ३८ प्रवासी जखमी झाले. यातील २ महिलांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने संबंधित राज्याचे मंत्री, जिल्हा प्रशासन यांच्याशी संवाद साधला आणि व्यवस्था उभी करण्यास सांगितले. दुर्दैवाने २ महिला जागेवरच मरण पावल्या. आणि २ लोक गंभीर आहेत. बाकी व्यवस्थित आहेत. दरम्यान, मृत पावलेल्या दोन्ही महिलांचे अंतिम संस्कार प्रयाग येथे केले जाणार आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.