

नवी दिल्ली : दिल्लीत महाराष्ट्राच्या राजकारणाने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. बुधवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर, दुसर्याच दिवशी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी संसद भवनातील पंतप्रधान कक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ विस्तार, राज्यसभा सीट आणि नगरपालिका निवडणुकांपर्यंतच्या चर्चांना जोर आला आहे. पटेल यांनी मात्र ही भेट औपचारिक असल्याचे सांगितले आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराचे कयास
केंद्रीय मंत्रिमंडळात संभाव्य फेरबदलाची चर्चा सुरू असताना पटेल यांची ही भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे. सूत्रांनुसार, अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात काही छोटे पण महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत. याच संभाव्य फेरबदलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) देखील केंद्रात जागा मिळवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे पटेल यांची पंतप्रधानांशी झालेली भेट ही राष्ट्रवादीच्या मंत्रिपदाच्या दाव्याला बळ देणारी ठरली आहे.
अजित पवारांची अनुपस्थिती
उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत उपस्थित होते आणि त्यांनी शरद पवार यांच्या स्नेहभोजनात भाग घेतला होता. मात्र, त्यांनी पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांशी कोणतीही राजकीय भेट घेतली नाही. जर मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या सहभागावर ठोस चर्चा सुरू असती, तर अजित पवार यांनी स्वतः पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असती. त्यांची गैरहजेरी या कयासाला बळ देते की, प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या स्वतःच्या भूमिकेसाठी आणि भविष्यातील शक्यतांसाठी सक्रिय झाले आहेत.
राष्ट्रवादीतील एकजुटीच्या चर्चा
महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे दोन्ही गट येत्या काळात पुन्हा एकत्र येण्याची चर्चा आहे. शरद पवार यांचा राज्यसभा कार्यकाळ एप्रिल 2026 मध्ये संपत आहे. त्यांनी भविष्यात सक्रिय राजकारणात पडद्यामागून भूमिका बजावण्याचा पर्याय खुला ठेवल्याचे संकेत दिले आहेत. जर दोन्ही गट एकत्र आले, तर राष्ट्रीय राजकारणात राष्ट्रवादीची बार्गेर्निंग पॉवर वाढणार हे निश्चित आहे. याचा फायदा केंद्रातील मंत्रिपदाच्या दावेदारांवर आणि महाराष्ट्रातील महायुतीमध्ये आपला दबदबा वाढवण्यावर होऊ शकतो.
शरद पवार यांना राज्यसभेत पाठवण्यावर चर्चा ?
पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरच्या या भेटीत शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेत पाठवण्याच्या संभाव्यतेवरही चर्चा झाल्याची शक्यता आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, दिल्लीतील संभाव्य फेरबदल आणि राष्ट्रवादीच्या बदलाच्या पार्श्वभूमीवर पटेल यांची ही भेट अनेक संदेश देऊन गेली आहे.