नवी दिल्ली : पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांना मोठ्या रकमेचे व्यवहार करण्यात येणारी अडचण आता दूर झाली आहे. उपलब्ध झालेल्या नव्या सुविधेंतर्गत पोस्ट ऑफिस आणि भारतीय पोस्ट पेमेंट बँकेतील (आयपीपीबी) खाते लिंक केल्यानंतर ग्राहकांना मोठ्या रकमेचे व्यवहार करता येणार आहेत. पोस्ट आणि आयपीपीबीत खाते असणाऱ्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. (post office banking update)
ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांची पोस्टात खाती आहेत. मात्र, ऑनलाईन सेवा उपलब्ध नसल्याने मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी ग्राहकांना आतापर्यंत नजीकच्या टपाल कार्यालयात जावे लागत होते. अडीअडचणीला तातडीने पैसे मिळत नव्हते. मात्र, आता ही समस्या दूर झाली आहे. आयपीपीबीत खाते असणाऱ्यांना बँकेचे अॅप डाऊनलोड करावे लागेल आणि आपले पोस्टाचे अकाऊंट त्यासोबत लिंक करावे. पोस्टाच्या खात्यावरील व्यवहाराची मर्यादा सध्या २५ हजार रुपये आहे. मात्र, आयपीपीबी अॅपद्वारे ग्राहक दोन लाख रुपयांपर्यंतचा व्यवहार करू शकतात, पोस्टाच्या कार्यालयातूनही तुम्हाला आयपीपीबीत खाते उघडता येते. आधार पडताळणीसह तीन मिनिटांत ही प्रक्रिया पार पडते, अशी माहिती मुख्य पोस्ट ऑफिसच्या परिसरात असलेले बँकेचे शाखा व्यवस्थापक गौरव यादव यांनी दिली. (post office banking update)
बहुतांश नागरिक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आयपीपीबीत खाते उघडतात. आयपीपीबी अॅपद्वारे ग्राहकांना इतर कोणत्याही बँकेच्या खात्यावर पैसे पाठविता येतात. ऑनलाईन पेमेंट, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातही ग्राहक या माध्यमातून रक्कम जमा करू शकतात. शिवाय, पोस्ट आणि आयपीपीबी खात्यावर झालेल्या व्यवहारांचा तपशीलही (स्टेटमेंट) ग्राहकांना अॅपवर पाहता येतो. (post office banking update)