

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिल्ली बॉम्बस्फोटाच्या दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित प्रकरणात हरियाणातील फरिदाबाद येथील अल फलाह विद्यापीठाच्या अडचणी आणखी वाढण्याचे संकेत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ‘ईडी’ने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या आधारे विद्यापीठाचा परिसर जप्त करण्याची तयारी सुरू केली आहे. या विद्यापीठाने गुन्हेगारी कारवायांतून पैसे जमा केल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.
याच विद्यापीठाशी संबंधित डॉ. उमर नबीने आत्मघाती हल्लेखोर बनून दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या नोव्हेंबरमध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात पंधराजणांचा मृत्यू झाला होता. यानंतर चौकशी यंत्रणांनी विद्यापीठाला दहशतवादी मॉड्यूलचे केंद्र मानून तपास तीव्र केला आहे. दिल्ली बॉम्बस्फोट आणि दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आणखी दोन डॉक्टर, शाहीन सईद आणि डॉ. मुजम्मिल यांना अटक केली.
डॉ. मुजम्मिलवर बॉम्बस्फोटासाठी स्फोटके जमा केल्याचा आणि डॉ. शाहीन सईदवर आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे. तपास संस्थेने या दोघांव्यतिरिक्त इतर अनेक कर्मचार्यांनाही अटक केली आहे. अल फलाह विद्यापीठाच्या बांधकामासाठी लागलेला पैसा गुन्हेगारी कारवायांतून मिळवण्यात आला काय, हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून ‘ईडी’ने तपास सुरू केला आहे. दिल्ली बॉम्बस्फोटानंतर ‘ईडी’ने विद्यापीठाचा प्रमुख जवाद अहमद सिद्दीकी याला अटक केली होती. विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता अल फलाह विद्यापीठाला नव्हती. तरीदेखील तशी मान्यता असल्याचे भासविण्यात आले. याद्वारे विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यात आली. मान्यता नसतानाही विद्यार्थ्यांना तेथे शिकविले जात होते, असेही ‘ईडी’च्या तपासात समोर आले आहे.
मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
या विद्यापीठाच्या परिसरातील इमारतींचे बांधकाम बेकायदा निधीतून करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित इमारतींचा ताबा ‘ईडी’ स्वतःकडे घेऊ शकते, असेही समोर आले आहे.