नवी दिल्ली : अमेरिकेने कथित बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना हद्दपार केल्यामुळे भारतातील राजकारण तापले आहे. काँग्रेसने याला केंद्र सरकारच्या परराष्ट्र नीतीची परीक्षा असल्याचे म्हणत आपले राजकीय हेतू स्पष्ट केले आहेत. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यापासून ते काँग्रेस नेते शशी थरूरपर्यंत सर्वांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर अमृतसरमध्ये विमान उतरण्यावरुन मनीष तिवारी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
याबद्दल पी. चिदंबरम यांनी सर्वप्रथम 'एक्स'वर पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, आज अमृतसरमध्ये उतरणाऱ्या अमेरिकन विमानावर सर्वांचे लक्ष असेल, जे कथित बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना परत आणेल. त्यांना हातकड्या घालून त्यांचे पाय दोरीने बांधलेले असतील का? ही भारत सरकारच्या परराष्ट्र नीतीची परिक्षा असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, माजी मंत्री आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतात परत पाठवल्या जाण्याच्या पद्धतीवरुन सवाल केले आहेत. ते म्हणाले की, या पद्धतीवर लक्ष्य का देण्यात आले नाही? पंतप्रधान मोदींनी बंद दाराआड हा मुद्दा उपस्थित केला का? तर काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी अमृतसरमध्ये अमेरिकन विमानाच्या उतरण्यावरुन प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, ही विमाने पंजाबमध्ये का उतरत आहेत? तुम्ही कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करत आहात? अमेरिकेत येणारा प्रत्येक बेकायदेशीर स्थलांतरित हा पंजाबचा आहे. असा संदेश तुम्ही देण्याचा प्रयत्न करत आहात का? हे विमान दिल्लीत किंवा इतरत्र उतरवू शकला असता. दरवेळी अमृतसरमध्येच का? दिल्लीला हे समजत नाही की पंजाब सहजासहजी अपमान सहन करत नाही आणि जेव्हा दिल्ली पंजाबचा अपमान करण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्यांना नेहमीच त्याची किंमत मोजावी लागते, असे ते म्हणाले.