

वसंत भोसले
पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या इतिहासात सर्वोच्च मतदानाची नोंद गुरुवारी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात झाली. बिहारमध्ये आजवर तिसर्यांदा 60 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. अधिक मतदानामुळे उत्साहाने सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि केंद्रीय निवडणूक आयोगदेखील दावे-प्रतिदावे करू लागलेला आहे. त्याची चर्चा राजकीय वर्तुळात शुक्रवारी रंगली.
बिहारच्या मध्य आणि पश्चिम भागातील अठरा जिल्ह्यांतील 121 विधानसभा मतदारसंघांमध्ये गुरुवारी उत्साहाने मतदान झाले. मागील निवडणुकीत 57.29 टक्के मतदान झाले होते. 2015च्या तुलनेत केवळ 00.38 टक्क्यांची वाढ होती. बिहारमध्ये मतदानाचे प्रमाण नेहमी कमी राहिलेले आहे. यावेळच्या मतदानाचे खरे श्रेय छठपूजेला जाते. कारण, बिहारच्या बाहेर असलेले मजूर मोठ्या संख्येने छठपूजेसाठी घरी परततात. त्यातील बहुसंख्य मजुरांनी मतदान करून परत जाण्याचा निर्णय घेतल्याचा दावा जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी केला आहे. त्यांनी या सर्वोच्च मतदानाचे श्रेय छठपूजेला दिले आहे. शिवाय विद्यमान सरकार बदलण्याकडे मतदारांचा कल आहे, असाही दावा त्यांनी केला आहे
भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सर्वोच्च मतदानाचे कारण मतदारांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेवर आणायचे आणि विशेषता नितीश कुमार यांच्यासाठी उत्साहाने मतदान करायचे होते. त्यामुळेच सर्वत्र सर्वोच्च मतदानाची नोंद झाली आहे. पहिल्या टप्प्यातील 121 पैकी शंभर जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडी जिंकेल, असाही असा दावा त्यांनी केला.
महागठबंधनचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी काल प्रचाराला बाहेर पडण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. बिहारच्या मतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदानात सहभागी होऊन सरकार बदलण्याच्या बाजूने कौल दिला असल्याचा दावा केला आहे. दररोज सर्वाधिक जाहीर सभा घेणार्यांमध्ये तेजस्वी यादव यांनी आघाडी घेतली आहे. काल गुरुवारी त्यांनी अठरा विधानसभा मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेतल्या.
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी काल पाटण्यात बोलताना दावा केला आहे की, बिहारमधील सर्वोच्च मतदानाची ऐतिहासिक नोंद आहे. सरकार बदलण्यासाठीच मतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदान केले आहे. बिहार राज्यात 1951- 52 पासून झालेल्या सर्वच सार्वत्रिक निवडणुकीमध्ये फक्त तीन निवडणुकीतच साठ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे.
बिहारमधील पुरुष मजूर मोठ्या संख्येने इतर राज्यांत कामाला जात असल्याने तुलनेने पुरुषांपेक्षा महिलांचे मतदान अधिक होत असल्याचे मागील आकडेवारीवरून स्पष्ट होते. 2015 मध्ये महिलांचे मतदान 60.48 टक्के, तर पुरुषांचे मतदान 53.22 टक्के झाले होते. 2020 मध्ये महिलांचे मतदान 56.69 टक्के, तर पुरुषांचे 54.69 टक्के झाले होते. पहिल्या टप्प्यात 3 कोटी 75 लाख 12 हजार 544 मतदार होते. पुरुष मतदारांची संख्या 1 कोटी 98 लाख, तर महिलांची संख्या 1 कोटी 76 लाख होती. परगावी मजुरीसाठी गेलेले पुरुष परत मतदानासाठी येत नसल्याने त्यांची टक्केवारी कमी असत होती.