

नोएडा; वृत्तसंस्था : ग्रेटर नोएडामध्ये हुंड्यासाठी पत्नीला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या विपिन भाटी याच्यावर पोलिसांनी गोळीबार केला आहे. पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या पायावर गोळी झाडण्यात आली.
मृत महिला निक्की भाटी हिचा पती विपिन आणि सासरच्यांनी 36 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी तिचा अमानुष छळ केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. निक्कीला मारहाण करून तिचे केस ओढत घराबाहेर काढल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे हा संपूर्ण प्रकार तिच्या सहा वर्षांच्या मुलासमोर घडला. आईच्या अंगावर काहीतरी टाकलं, तिला चापट मारली आणि लायटरने आग लावली, असा जबाब तिच्या मुलाने दिला आहे. निक्कीच्या कुटुंबीयांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपिनने तपास अधिकार्याचे पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आत्मसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र मी तिला मारले नाही, पती-पत्नीत वाद होतच असतात, असा दावा विपिनने रुग्णालयातून केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून थिनरच्या बाटल्या जप्त केल्या असून, कुटुंबातील इतर सदस्यांची चौकशी सुरू आहे.