

नवी दिल्ली: विकसित भारत २०४७ मध्ये म्हणजेच स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाकडे वाटचाल करत असताना देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू युवक असतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. नवी दिल्लीत आयोजित ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२६’च्या समारोप सत्रात ते बोलत होते. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत समारोप सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशातील युवकांच्या भूमिकेवर भर देत देशातील युवकांसाठी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे महत्त्व पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले आणि देशभरातून दिल्लीत आलेल्या युवकांना प्रोत्साहित केले. दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींसह केंद्रीय क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविया, राज्यमंत्री रक्षा खडसे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, स्वामी विवेकानंदांचे विचार आजही युवकांसाठी प्रेरणादायी असून आत्मविश्वास, राष्ट्रभक्तीचा संदेश देतात. तसेच भारताची ताकद, अर्थव्यवस्था आणि जागतिक नेतृत्व युवकांच्या क्षमतेवर अवलंबून आहे. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी युवक नेतृत्व, नाविन्यपूर्ण विचार आणि सक्रिय सहभाग आवश्यक आहे. ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ हा युवकांना थेट विकास प्रक्रियेत सहभागी करणारा प्रभावी मंच ठरत आहे.
या उपक्रमाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. कोट्यवधी युवक या प्रक्रियेशी जोडले गेले आहेत. लोकशाहीतील युवक सहभाग आणि प्रशासनातील नव्या कल्पनांवर सादर करण्यात आलेल्या सूचना अत्यंत सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले. आत्मविश्वास आणि स्वदेशी क्षमतांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन करत पंतप्रधानांनी युवकांना न्यूनगंड सोडून भारताच्या विकासात सक्रिय सहभाग घेण्यास सांगितले. विकसित, आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासपूर्ण भारत घडवण्यात युवकांची भूमिका निर्णायक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
२०१४ पूर्वीच्या परिस्थितीचा आढावा घेताना पंतप्रधानांनी धोरणात्मक निराशा, लालफितशाहीचा कारभार आणि युवकांसाठी मर्यादित संधी याकडे लक्ष वेधत काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले. याचवेळी, गेल्या १० वर्षांत राबवण्यात आलेल्या सुधारणांमुळे युवकांसाठी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. स्टार्टअप, डिजिटल तंत्रज्ञान, अंतराळ, ड्रोन आणि संरक्षण क्षेत्रात युवकांना नेतृत्वाची संधी मिळत आहे. युवकांसाठी कौशल्य विकास, शिक्षण सुधारणा आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षणावर सरकारचा भर आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण, आयटीआय आधुनिकीकरण आणि परदेशी विद्यापीठांच्या सहभागामुळे युवकांना जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी सक्षम केले जात आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.