Narendra Modi On Paperleak: पेपरफुटीवर आज मोठा निर्णय! मध्यरात्री पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ संदेश

शुक्रवारी आणखी मोठी आणि कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत पंतप्रधान मोदी यांनी दिले
Narendra Modi
Narendra Modi Pudhari
Published on
Updated on

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने राजधानी दिल्लीतील वातावरण तापले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मध्यरात्री विद्यार्थ्यांना उद्देशून व्हिडिओ संदेश जारी केला. “पेपरफुटी हा काही साधा विषय नाही. या प्रकरणी शुक्रवारी आणखी मोठी आणि कठोर कारवाई केली जाईल,” असे स्पष्ट संकेत पंतप्रधान मोदी यांनी दिले. त्यामुळे आंदोलकांच्या मागण्या पूर्ण होणार का याकडे लक्ष लागले आहे.

मागील अडीच महिन्यांपासून देशभरात पेपरफुटीच्या घटनांवरून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री उशिरा पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत पेपरफुटीविरोधात आणखी कठोर कारवाई करण्यासाठी शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा होणार असल्याचे सांगितले. पेपरफुटीच्या घटनांनंतर सरकारने गेल्या अडीच महिन्यांत अनेक पावले उचलल्याचा दावा पंतप्रधानांनी केला. मात्र, विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच पंतप्रधानांनी मध्यरात्री व्हिडिओ संदेश जारी केल्याने सरकार आता कोणता मोठा निर्णय घेणार, याबाबत राजकीय आणि विद्यार्थी वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

कॅबिनेट बैठकीकडे लक्ष

दरम्यान, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील कथित कारवाईविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून विरोधकांनीही केंद्र सरकारवर दबाव वाढवला आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या या संदेशानंतर शुक्रवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर निर्णय होणार का, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार का, या बाबतची चर्चा पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओ मेसेजनंतर सुरू झाली आहे.

आज सीजेपीचे शिष्टमंडळ सरकारच्या प्रतिनिधींना भेटणार!

शुक्रवारी सीजेपीचे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जे. पी. नड्डा यांना भेटण्याची शक्यता आहे. गुरुवारी जे. पी. नड्डा जितेंद्र सिंह यांनी सरकार चर्चेला तयार असल्याचे म्हटले होते. मात्र सीजेपीने मंत्र्यांच्या निवासस्थानी किंवा कार्यालयात चर्चा होणार नाही. चर्चा एकतर जंतर-मंतरवर होईल किंवा एखाद्या तटस्थ ठिकाणी होईल, असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीजेपीचे शिष्टमंडळ सरकारकडे चर्चेला जाणार असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news